महाराष्ट्र २०४७ व्हिजन डॉक्युमेंटसाठी नागरिक सर्व्हेक्षण
छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्र २०४७ चे व्हिजन डॉक्युमेंट तयार केले जाणार असून त्यासाठी नागरिकांचे सर्व्हेक्षण केले जाणार आहे. अर्थात नागरिकांची मते, विचार, संकल्पना नोंदविल्या जाणार आहेत. त्यात नागरिकांनी आपली मते नोंदवावी असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि.६ मे ते २ ऑक्टोबर या कालावधीत १५० दिवसांचा कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत ‘महाराष्ट्र २०४७’ व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी राज्यभरात नागरिक सर्वेक्षण राबवले जाणार आहे. हे सर्वेक्षण दि.१८ जून ते १७ जुलै यादरम्यान होणार असून, त्यादृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व कार्यालयांनाही ही माहिती देण्यात आली असून सर्वेक्षणाच्या माहितीचा प्रसार विविध माध्यमांतून करण्यात येत आहे. यामध्ये व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यांसारखी सामाजिक संकेतस्थळे, स्थानिक केबल नेटवर्क, ग्रामपंचायत पातळीवरील मंच, शाळा, महाविद्यालये, वाहतूक साधने, बाजारपेठा, वृत्तपत्रे, बॅनर-पोस्टर आदींचा समावेश आहे. प्रत्येक गाव, वाडा, शहरी भागामध्ये ही माहिती पोहोचवण्यासाठी ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्थानिक कार्यकर्ते यांना सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या सर्व्हेक्षणात नागरिकांना ऑनलाईनही सहभागी होता येणार आहे. त्याद्वारे एक लहानशी प्रश्नावली भरुन द्यावयाची आहे. त्यात टाईप करुन अथवा मोबाईल मध्ये आवाज रेकॉर्ड करुन आपले मत नोंदविण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात सहभागासाठी https://wa.link/093s9m या लिंकचा वापर करून नागरिकांनी आपली मते व सूचना द्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे. तसेच सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी यामध्ये सहभाग नोंदवावा, असेही आवाहन केले आहे.
