Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादजालन्याजवळ साकारतेय 51 फूट उंचीचे भारत माता मंदिर

जालन्याजवळ साकारतेय 51 फूट उंचीचे भारत माता मंदिर

जालन्याजवळ साकारतेय 51 फूट उंचीचे भारत माता मंदिर
भगवानबाबा आनंदगडकर यांच्या संकल्पनेतून  सर्वधर्मीयांना एका धाग्यात आणत राष्ट्रभक्ती चेतविण्याचा प्रयत्न
जालना/प्रतिनिधी/   महान संत ह. भ. प. डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांच्या संकल्पनेतून जालना शहराजवळील नंदापूर येथे तब्बल 51 फूट उंचीचे भारत मातेचे मंदिर साकारले जात आहे. हे मंदिर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात एक आदर्श ठरणार असून, सुरत (गुजरात) येथील भव्य भारत माता मंदिरानंतर नंदापूरचे हे मंदिर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे भव्य भारत माता मंदिर ठरणार आहे. हे मंदिर केवळ एक धार्मिक केंद्र नसून, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक त्याचबरोबर या ठिकाणी राबविले जाणारे विविध उपक्रम निराधारांना आधार, निराश्रीत विद्यार्थ्यांना आश्रय, तणावमुक्ती व रोजगाराभिमुख दृष्टिकोन असणारे  ठरणार आहे. इथे कोणतीही जात, धर्म, पंथ, प्रांत भिंत ठरणार नसून, भारत माता ही सर्वांची आई या भावनेने सर्वांना एका धाग्यात बांधून  राष्ट्रभक्ती आणि विश्वबंधुत्वाची संस्कृती रुजवली जाणार असल्याने हे मंदिर एकता, भारतमातेप्रती श्रद्धा आणि संस्कृती संस्कृतीचे प्रतीक त्याचबरोबर देशातील एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ ठरणार आहे.
         नंदापुर येथील समृद्धी महामार्गाच्या बाजूला साकारात असलेले 51 फूट उंचीचे मंदिर 6 किलोमीटर अंतरावरून दिसणार, एवढी या मंदिराची उंची राहील.
भगवान बाबांनी भारत माता मंदिर उभारण्याचा संकल्प केल्यानंतर नंदापूरचे सामान्य आणि जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेले शेतकरी जनार्दन पुंजाराम उबाळे यांनी त्यांच्याकडील सात एकरपैकी 1 एकर शेती दान दिली आणि प्रसिद्ध मंदिरशास्त्र अभ्यासक अभियंते चंद्रप्रकाश शर्मा, भूषण देशमुख, एस. एन. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली 4 महिन्यापूर्वी मंदिराच्या कामाला सुरुवात झाली, यासाठी दिलीपराव काळे, विष्णुपंत बुजाडे, गणेश सुपारकर, राजू सतकर, कल्याणराव देशपांडे, डॉ. सुभाष भाले, आधी प्रमुख कार्यकर्ते या कार्यात पूर्ण वेळ सेवा देत आहेत. जनतेच्या यथाशक्ती आर्थिक योगदानातून मंदिराची उभारणी केली जाणार आहे. सध्या पहिला स्लॅब पडला आहे. प्रत्येकी दहा फूट उंच याप्रमाणे 30 फुटाचे पायथ्याचे तीन टप्प्यातील काम झाल्यानंतर भारत मातेची भव्यमूर्ती विराजमान केली जाणार आहे. ही मूर्ती बंदिस्त गाभाऱ्यात नसल्याने किमान सहा किलोमीटर अंतरावरूनही सर्वांना दर्शनाचा लाभ होणार आहे. नवीन तंत्रज्ञान व पारंपारिक शैलीचा अनोखा संगम असलेल्या मंदिराचा कळस दक्षिण भारतातील मंदिर शैलीप्रमाणे राहणार असून, मंदिरात भारत माता मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी सरसंघचालकांना निमंत्रित करण्यात येणार असून, त्यासाठी भगवान बाबांचे प्रयत्न सुरू आहेत.
        या मंदिराची उभारणी तीन मजली आहे. खालील दोन मजल्यांमध्ये चिंतनासाठी हॉल, त्यातदेखील आणखी एक भारत मातेची मूर्ती राहील. उर्वरित जागेमध्ये दहा बाय दहा आकाराच्या दहा खोल्या असतील. तरुण पिढीला स्वातंत्र्यसंग्रामात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा इतिहास माहिती व्हावा, प्रेरणा मिळावी यासाठी स्थायी स्वरूपात क्रांतिकारकांची चित्रमय प्रदर्शनी राहणार आहे. भगवान बाबा यांची कुटी, अत्यंत पवित्र वातावरणात साधना करता यावी, यासाठी सिद्धसाधक आश्रम  राहणार असून तेथे निशुल्क व्यवस्था केली जाणार आहे. अनेकजण ताणतणावातून घर सोडून जातात, आत्महत्येचा प्रयत्न करतात त्यांच्यासह  ज्यांना आधार नाही, अशांसाठी ही वास्तू आश्रयस्थान बनणार असल्याचे भगवान बाबांनी सांगितले. ते म्हणाले की, “शिक्षणासाठी नव्हे सुकडीसाठी तुकडीत येऊन बसला” याप्रमाणे तणावग्रस्तांना इथपर्यंत आणून हाताला काम, मुखात राम, इतका-तितका गाळ घाम या संतोक्तीनुसार त्यांच्या हाताला काम देण्यासाठी छोटे  उद्योग या वास्तूत सुरू करून कष्ट करणे महत्त्वाचे आहे, ही भावना त्यांच्यात रुजवली जाणार आहे. सोबतच या ठिकाणी  अनाथांच्या सेवेला विशेष प्राधान्य राहणार असून, जे विद्यार्थी वाड्या, तांडे आणि वस्त्यांवर राहतात, जिथे शिक्षणाची व्यवस्था नाही, अभ्यासासाठी योग्य वातावरण नाही, अशा विद्यार्थ्यांची या ठिकाणी निवास आणि भोजनाची व्यवस्था केली जाणार असून, त्यांनी 17 नंबरचा फॉर्म भरून दहावीची परीक्षा द्यायची, अशी संकल्पना आहे. या मंदिराच्या माध्यमातून केवळ श्रद्धास्थान नव्हे तर शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची मालिकाही राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीचे बाळकडू देणारे कार्यक्रम, संस्कार केंद्र, वाचनालय आणि प्रेरणादायी कार्यक्रम राबवले जाणार असल्याचे भगवान बाबांनी सांगितले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments