Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादसेवाभावाची ज्योत पुढील पिढीने तेवत ठेवली तरच डॉक्टरांचे देवत्व अबाधित राहील-डॉ. प्रधान

सेवाभावाची ज्योत पुढील पिढीने तेवत ठेवली तरच डॉक्टरांचे देवत्व अबाधित राहील-डॉ. प्रधान

सेवाभावाची ज्योत पुढील पिढीने तेवत ठेवली
तरच डॉक्टरांचे देवत्व अबाधित राहील-डॉ. प्रधान
जालना/प्रतिनिधी/ वैद्यकीय क्षेत्र कॉर्पोरेट संस्कृतीच्या दिशेने झुकत असून, आगामी दशकात कॉर्पोरेट हॉस्पिटल्सचा प्रभाव वाढत जाईल आणि नफा कमावणे हा उद्देश राहील. एआय, रोबोटिक सर्जरी यांसारख्या तंत्रज्ञानामुळे काही प्रमाणात डॉक्टरांची गरज कमी होईल, विशेषतः पॅथॉलॉजी क्षेत्रात मोठा परिणाम दिसेल. पुढील पिढीकडे प्रचंड पैसा, साधने आणि तंत्रज्ञान असेल. त्यामुळे आजचे सरासरी आयुर्मान 80- 85 वर्षांवरून 100 ते 120 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आज जी सेवा भावना डॉक्टरांमध्ये आहे, ती पुढच्या पिढीपर्यंत पोचवली गेली तरच डॉक्टरांचे देवत्व अबाधित राहील, असे प्रतिपादन माजी प्रांतपाल तथा रोटरीचा सर्वोच्च अबाऊ सर्विस सेल्फ अवार्ड प्राप्त डॉ. राजीव प्रधान यांनी येथे बोलताना केले.
     रोटरी क्लब ऑफ जालनातर्फे रविवार दि. 6 जुलै रोजी डॉक्टर डे निमित्त शहरातील सर्व क्षेत्रातील डॉक्टर्सचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील बदलत्या वास्तवावर सखोल विचार मांडले. व्यासपीठावर क्लबच्या अध्यक्ष वर्षा पित्ती, सचिव लक्ष्मीनिवास मल्लावत, प्रकल्पप्रमुख डॉ. चारुस्मिता हवालदार आणि डॉ. विजय जेथलिया यांची उपस्थिती होती.
     डॉ. प्रधान पुढे म्हणाले की, डॉक्टर जेवढ्या निष्ठेने व समर्पणाने सेवा देतात, तेवढी सेवा कोणताच समाज घटक देत नाही. ते रात्रंदिवस रुग्णसेवेत झिजतात, त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. पूर्वीच्या आणि आजच्या डॉक्टरांच्या पिढीमध्ये मोठं अंतर निर्माण झालं आहे. शिक्षणाचा कालावधी वाढला आहे. परीक्षा पद्धती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. केवळ पीजी करून भागत नाही; आता सुपर स्पेशालायझेशन करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे वय वाढत जातं आणि करिअर उशिरा सुरू होतं. या बदलामुळे डॉक्टरांची कार्यपद्धतीही बदलते आहे, असे ते म्हणाले. डॉ. प्रधान यांनी सामाजिक समतेच्या मुद्द्यावर भर देत सांगितले की, भारत वगळता जगातील बहुतांश देशांमध्ये स्त्री-पुरुष भेदभाव जवळजवळ नाही. मात्र, भारतात केवळ 8 ते 10 टक्के महिला नोकरी करतात. जर हे प्रमाण 25 टक्क्यांवर गेले, तर देशाच्या जीडीपीत 1 टक्का वाढ होऊ शकते. महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या अर्थकारणातील सहभागाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
     प्रसंगी उपस्थित सर्व डॉक्टरांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला रोटरी परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments