बुधवारी जेईएस मध्ये ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’ कार्यक्रमाचे आयोजन
जालना: भक्तिरसात न्हालेल्या आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेच्या पवित्र पूर्वसंध्येच्या निमित्ताने, जालना शहरातील संगीत आणि भक्तिकला प्रेमींसाठी ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’ एक अनोखा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कलावर्धिनी जालना आणि जेईएस महाविद्यालयाचा ललित कला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या चुन्नीलाल गिरीलाल सभागृहात बुधवार(दि. ९) बुधवारी रोजी सायंकाळी ६:०० वाजता या भक्तिमय सोहळ्याला प्रारंभ होईल.
या कार्यक्रमात अनेक नामांकित कलाकार यामध्ये सहभागी होणार असून प्रमुख सादरकर्ते म्हणून डॉ. मोहिनी रायबागकर, प्रा. शाहीर कल्याण उगले, शाहीर माधवी माळी उगले, तसेच तबलावादनात कुशलता प्राप्त जय कराड यांचे मनोहारी सादरीकरण रसिकांच्या अनुभवास येणार आहे. विशेष म्हणजे लोककला विभागातील सर्व विद्यार्थीही विविध भक्तिगीते सादर करणार आहेत. यामध्ये शोहेब शेख, हरेश उगले,आदित्य मुदीराज, प्रतीक साळुंखे,ज्ञानेश उगले, आनंद घुले,ओंकार सुलाखे, सोहम उगले व गणेश साळवे यांचा या कार्यक्रमात सहभागी आहे
कार्यक्रमाचे निरूपण कवी, गीतकार आणि अभिनेते विनोद जैतमहाल करणार आहेत. विठ्ठल भक्तीची परंपरा, अभंग व लोकसंगीताच्या गजराच्या माध्यमातून संतांच्या भक्तिसंगीताचा अनुभव देणारा हा कार्यक्रम आहे.
विठ्ठल नामाचा जयघोष, संतांच्या ओव्या-अभंगांचा गजर आणि जीवनमूल्यांची शिकवण देणारी गुरुपौर्णिमा यांचे सुरेख संगम ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’ या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून, जालना शहरातील सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तीमय वातावरणात सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री यांनी केले आहे.
कलावर्धिनी जालनाच्या उद्घाटनपूर्व नांदी :
जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री यांच्या पुढाकाराने ‘कलावर्धिनी’ हा जालना शहरातील कलावंतांचा एक नवा समूह सुरू करण्यात आला आहे. जालना शहरातील रसिकांची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी हा समूह स्थापन करण्यात आला आहे.
या अंतर्गत वर्षभरात ६ कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे, ज्यात सुगम आणि शास्त्रीय संगीत मैफिली, नाट्य महोत्सव, लोककला महोत्सव आणि मराठी-हिंदी गीतांचा वाद्यवृंद यांचा समावेश आहे. या समूहासाठी सदस्य नोंदणी सुरू झाली आहे. फक्त २०० सदस्यांची नोंदणी केली जाणार असून, नोंदणीसाठी डॉ. मोहिनी रायबागकर किंवा डॉ. बाबासाहेब वाघ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
