हे तर राहुल गांधींच्या नैराश्याचे प्रदर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रहार
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे नैराश्यग्रस्त झालेल्या राहुल गांधी यांनी तर्कहीन दावे करून, महाराष्ट्रातील पराभवाचे खापर मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीवर फोडण्याआधी याच वाढीव टक्केवारीमुळे विजयी झालेल्या काँग्रेस उमेदवारांकडून वास्तव जाणून घेतले असते तर हवेत तीर मारण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या वाढीव टक्केवारीबाबत निवडणूक आयोगाकडून स्पष्ट खुलासा झालेला असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पराभवाच्या नैराश्यातून तीच संशयाची राळ उडवली आहे, पण मालाड मतदारसंघात 11 टक्के (38625) मतदार वाढले. तेथे विजयी झालेले अस्लम शेख, पश्चिम नागपूर मतदारसंघात 7 टक्के (27065) मतदार वाढले, तेथे विजयी झालेले विकास ठाकरे, उत्तर नागपूरमध्ये 7 टक्के वाढ झाली, तेथे काँग्रेसचेच नितीन राऊत विजयी झाले, तर पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी मतदारसंघात 10 टक्के (50911) मतदार वाढले व तेथे शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे विजयी झाले. मुंब्रा मतदारसंघात 9 टक्के मतदार वाढले, तेथेही शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड विजयी झाले. या निकालाची स्वपक्षीयांकडून माहिती घेतली असती तर अशी निरर्थक निशाणबाजी करण्याची वेळ राहुल गांधी यांच्यावर आली नसती, असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले आहे.
