विजेचा धक्का लागून विवाहितेचा मृत्यू
डाग पिंपळगांव येथील घटना
वैजापूर/प्रतिनिधी/ पाच महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका २१ वर्षीय तरुणीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना वैजापूर तालुक्यातील डागपिंपळगाव येथे घडली. ईशा सचिन पवार असे मयत तरुणीचे नाव आहे.
शुक्रवारी दुपारी ईशा पवार या विद्युत पंप चालू करण्यासाठी गेल्या असता त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. ही बाब निदर्शनासनास येताच नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यानी तपासून त्यांना मृत घोषित केले.
घटनेचे वृत्त कळताच वीरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे व हवालदार राजेंद्र भालेराव यांनी रुग्णालयात धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.