प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) च्या शाखा अभियंत्याकडून आर्थिक फायद्यासाठी शासन आदेशाची पायमल्ली!
गरजू लाभार्थी ५-६ वर्षापासून वाऱ्यावर तर एकाच कुटुंबातील धनदांडग्यांना चार – चार घरकुल देण्याचा प्रताप
बदनापूर/प्रतिनिधी/ महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारच्या वतीने ग्रामीण भागातील गोर-गरीब जनतेला हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण ) ही एक महत्वकांक्षी योजना राबविण्यात येत असून, सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडून वेळोवेळी शासन निर्णय व परिपत्रके काढण्यात येत आहे. परंतु, बदनापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गरजू लाभार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असून, असंख्य लाभार्थ्यांना सुमारे 5-6 वर्ष उलटूनही लाभ मिळालेला नाही तर दुसरीकडे धनदांडग्यांना काही काहीमहिण्यात एक कुटुंबात चार- चार घरकुल देण्याचा प्रताप हा उज्जैनपुरी, हिवरा, राळा व अन्वी या गावास नेमणूक असलेले शाखा अभियंता श्री.कपिल राठोड यांनी केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. श्री. राठोड हे शासनाच्या महत्वकांक्षी योजनेला आपल्या आर्थिक फायद्यासाठी खोडा घालत आहे. सदर अभियंते हे त्यांना नेमणूक दिलेल्या परिसरातील लक्ष्मण नगर तांडा येथिल रहिवाशी असल्याने ते आपल्या ओळखीचा फायदा घेत राजरोसपणे प्रत्येकी लाभार्थ्यांकडून टप्पेनिहाय धनादेश (MAHA DBT) होण्यासाठी 5 हजार रुपये म्हणजेच एका लाभार्थ्यांकडून सुमारे 15-20 हजार रुपये वसुल करीत असल्याने गोर गरिब असलेल्या खऱ्या लाभार्थ्यांच्या पदरी वर्षानुवर्षे प्रतीक्षा आली असुन, अनेक लाभार्थ्यांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे. तसेच अपात्र लाभार्थ्यांना मात्र काही महिन्यातच एका कुटुंबातील 4-5 सदस्यांना टप्पेनिहाय धनादेश देण्यासाठी 5 हजार रुपये प्रमाणे पैसे घेऊन लाभ देण्यात येत असल्याने सर्वसामान्य जनतेत नाराजी पसरली आहे. तसेच प्रतिक्षा यादीतील लाभार्थी यांनी सदरील शाखा अभियंता यांच्याकडे आमचा घरकुल सर्वे 2018 चा असून, आमचे घरकुल का आले नाही असे विचारले असता, संबंधित अभियंता कडून प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देत सांगण्यात येते की, ”घरकुल मंजुरी व टप्पेनिहाय लाभासाठी वरची कृपा असावी लागते” असे सांगण्यात येते. संबंधित प्रतीक्षा यादीतील लाभार्थी याने परिसरातील काही लाभार्थ्यांकडून वरची कृपा बाबत माहिती घेतल्यावर असे समजते की, संबंधित शाखा अभियंता यांचा वरची कृपा हा पैसे मागणी कोड असून, वरची कृपा म्हणून प्रत्येक टप्प्याच्या लाभ घेण्यापूर्वी सदरील शाखा अभियंता यांना पाच हजार रुपये मोजावे लागते व वरची कृपा दिल्यावर सदरील घरकुल लाभार्थ्यास घर बांधण्याची आवश्यकताही पडत नाही सर्व टप्पे त्याच्या केवायसी असलेल्या बँक खात्यात महाडीबीटी ने जमा होत असल्याचे सांगितले. तसेच वरची कृपा मध्ये संबंधित शाखा अभियंता, ग्रामसेवक व विस्तार अधिकारी यांचा वाटा असल्यामुळे संबंधित कर्मचारी हा वरची कृपा म्हणून संबोधत असल्याची चर्चा आहे. तसेच शाखा अभियंता यांची नेमणूक ही वशिलेबाजीने झाली असल्याने संबंधित शाखा अभियंता यांच्याकडून भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. या भ्रष्टाचाराच्या कळसाला वैतागून बदनापूर तालुक्यातील एका गावातील काही पात्र लाभार्थ्यांनी संबंधित शाखा अभियंता यांना कोंडून मारले असल्याची जोरदार चर्चा आहे. तरी सदर वादग्रस्त शाखा अभियंता हे वरिष्ठ अधिकारी हे पाहुणे असल्याचा दावा करत आपली मनमानी करत राजरोसपणे गोर गरिबांचे हक्काचे घरकुल मधून प्रत्येकी 20-20 हजार रुपये घेऊन शासनाचे सर्व नियम व अटी पायदळी तुडवत श्रीमंत लोकांना वाटत असल्याचे जोरदार चर्चा सुरू आहे. खरे लाभार्थी यांना आपल्या घरकुल मंजुरी बाबत शाखा अभियंता यांना शोधूनही ते सापडत नसल्याने तसेच संबंधित शाखा अभियंता यांना फोन केल्यास ते उचलत नसल्याने सर्व सामान्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह सरपंच ही वैतागले आहे. त्यामुळे वरची कृपा नसलेले प्रतीक्षा यादीतील लाभार्थी हे सन 2018 पासून आता 2025 पर्यंत प्रतीक्षा यादीत समावेश आहेत. तसेच याउलट नव्याने सर्वेक्षण करून नाव समाविष्ट करून घेणाऱ्या लाभार्थी ज्यांनी संबंधित कर्मचारी यांच्यावर वरची कृपा केली आहे ते लाभार्थी सर्व टप्पेनिहाय लाभ घेऊन मोकळे झाले असल्याचे दिसून येते. घरकुलाचे अभियंते राजरोसपणे गैव्यवहार करीत असल्याचे गट विकास अधिकारी ह्या बघ्याची भूमिका घेत असल्याचे त्यांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याकडे मुख्य कार्यकारी अभियंत्यासह जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी लक्ष देऊन संबंधित शाखा अभियंता यांच्या गैरप्रकाराची चौकशी करून त्यांच्यावर आर्थिक फायद्यासाठी शासनाची दिशाभूल करून फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.