मशिप्र मंडळाच्या कार्यकारिणीचा बदल अर्ज मंजूर
मा. सहायक धर्मादाय आयुक्तांकडून नवीन सभासद नोंदणी वैध!
छत्रपती संभाजीनगर/ मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ ही मराठवाड्यातील एक नामांकित व सर्वांत मोठा विस्तार असलेली शिक्षण संस्था आहे. न्यासाच्या कार्यकारी मंडळात ७ पदाधिकारी व १४ सदस्य आहेत. न्यासाच्या घटनेतील तरतुदीनुसार सन २०१८ – २०२३ या कालावधीसाठी नवीन कार्यकारी मंडळाची निवड करणे आवश्यक असल्याने न्यासाचे सरचिटणीस आ. श्री. सतीश चव्हाण यांनी दि. १७ मे २०१८ रोजी सर्वसाधारण सभेची नोटीस सर्व वैध सभासदांना पाठविली होती. त्यानुसार, नवीन कार्यकारी मंडळ निवडण्यासाठी न्यासाचे अध्यक्ष आ. प्रकाश सोळंके यांचे अध्यक्षतेखाली दिनांक ०४ जून २०१८ रोजी सकाळी १० वाजता देवगिरी महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागोर सभागृह, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे न्यासाची सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती.
त्यानुसार, दि.०४/०६/२०१८ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेस न्यासाचे वैध ३४३ पैकी ३३१ सभासद उपस्थित होते. या सभेच्या विषयपत्रिकेत नमूद केलेप्रमाणे सभेचे कामकाज होऊन, सन २०१८-२०२३ या कालावधीसाठी न्यासाचे नवीन कार्यकारी मंडळाची निवडणूक पार पडली. यात आ. सतीश चव्हाण, आ. प्रकाश सोळंके, माजी आ. अमरसिंह पंडित यांचे नेतृत्वाखालील नवीन कार्यकारी मंडळ मोठ्या मताधिक्याने निवडून आले. दुसरीकडे, विरोधी उमेदवारांना मोठ्या मतांच्या फरकाने पराभवास सामोरे जावे लागले. विजयी उमेदवारांना सुमारे २७७-२८० दरम्यान मते मिळाली तर, पराभूत उमेदवारांना सुमारे ४९-५२ दरम्यान मते मिळाली.
या बदलासंबधी मा. धर्मादाय उपायुक्त, औरंगाबाद यांचे कार्यालयात नियमानुसार बदल अर्ज क्रमांक ७६१/२०१८ सादर करण्यात आला होता. सदरील बदल अर्जास न्यासाचे तत्कालीन उपाध्यक्ष श्री. मानसिंग पवार, तत्कालीन कार्यकारिणी सदस्य श्री. चंद्रशेखर राजूरकर, सभासद डॉ. लव पानसंबळ, सभासद श्री. देविदास पवार यांनी मा. न्यायालयाकडे अर्ज सादर करून आक्षेप नोंदवला. सन २०१३ ते २०१८ या कालावधीतील कार्यकारी मंडळाने नोंदविलेले सर्व नवीन सभासद अवैध असून, दि. ०४/०६/२०१८ रोजीची निवडणूक बेकायदेशीर असल्याने, सदरील बदल अर्ज नामंजूर करावा, अशी मागणी त्यांनी मा. न्यायालयाकडे केली होती.
दुसरीकडे, नवीन सभासद श्री. नितीन बागवे, श्री. ज्ञानोबा मोहिते, श्री. राहुल घोगरे व श्री. राम मोरे यांनी हस्तक्षेपकार म्हणून अर्ज सादर करून, नवीन सभासदांची नोंदणी न्यासाच्या घटनेतील तरतुदीनुसार करण्यात आली असून, त्याबाबत घटनेतील सर्व तरतुदींचे पालन करून, नवीन सभासद नोंदविण्यात आले असल्याने ते वैध आहेत. दि. ०४/०६/२०१८ रोजीची निवडणूक ही लोकशाही पद्धतीने, कायदेशीर मार्गाने घेण्यात आली असून, सदरील बदल अर्ज मंजूर करण्यात यावा, अशी त्यांनी मा. न्यायालयाकडे मागणी केली होती.
सदरील प्रकरणात अर्जदार विश्वस्त यांनी ८ साक्षीदार तपासले. हस्तक्षेपकार श्री. नितीन बागवे यांनी १ व आक्षेपक डॉ. लव पानसंबळ यांनी २ साक्षीदार तपासले. उर्वरित पक्षकारांनी साक्षीदार म्हणून मा. न्यायालयासमोर यायचे टाळले. प्रकरणात तीन आठवडे अंतिम युक्तीवाद व प्रतियुक्तीवाद चालला.
सुनावणीअंती मा. सहायक धर्मादाय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांनी बदल अर्ज क्र.७६१/२०१८ दिनांक १९/०६/२०२५ च्या आदेशाने गुणवत्तेवर मंजूर केला असून, दि. ०४/०६/२०१८ रोजीच्या सर्वसाधारण सभेत निवडण्यात आलेल्या कार्यकारी मंडळाची निवडणूक व नवीन सभासद नोंदणी न्यासाचे नियमावलीनुसार झाली असल्याने वैध ठरविली आहे. यामुळे, मंडळावर पुन्हा एकदा आ. सतीश चव्हाण, आ. प्रकाश सोळंके, माजी आ. अमरसिंह पंडित यांचे अधिपत्य सिद्ध झाले आहे.
प्रकरणात, मशिप्र मंडळाचे वतीने विधिज्ञ श्री. श्रीकांत अदवंत व श्री. प्रशांत निकम, हस्तक्षेपकार श्री. मोहिते, श्री. घोगरे व श्री. मोरे यांचे वतीने ज्येष्ठ विधिज्ञ श्री. नंदकुमार खंदारे व श्री. मेघराज चौधरी, हस्तक्षेपकार श्री. नितीन बागवे यांचे वतीने श्री. दिलीप चौधरी यांनी काम पहिले. आक्षेपकार श्री. मानसिंग पवार व श्री. राजूरकर यांचे वतीने श्री. अक्षय खोत, डॉ. लव पानसंबळ यांचे वतीने श्री. प्रफुल्ल पाटणी व श्रीमती. सुप्रिया पानसंबळ, श्री. देविदास पवार यांचे वतीने श्री. विवेक ढगे व श्री. दीपेंद्र कर्णिक, श्री. किरण जाधव व श्री. नितीनचंद्र पाटील यांचे वतीने श्री. प्रल्हाद बचाटे यांनी काम पहिले.