जयसिंगपूर/प्रतिनिधी/ प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी राज्यातील शेतक-यांची कर्जमुक्तीसह दिव्यांग अनुदान वाढ व विविध मागण्यासाठी सुरू केलेले आमरण उपोषण ७ व्या दिवशी राज्य सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. बच्चू कडूंच्या उपोषणास सरकार दाद देत नाही व कर्जमुक्ती विषयी चालढकल करीत आहे याचा महाराष्ट्रातील शेतक-यांना प्रचंड संताप आलेला होता. त्यामुळे कर्जमुक्ती ही केवळ बच्चू कडूंचीच मागणी नाही तर संपुर्ण राज्यातील शेतक-यांची मागणी आहे आणि ती रास्तही आहे. कारण सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देवून महायुतीने शेतक-यांची मते घेतलेली आहेत. म्हणून शेतक-यांची ताकद दाखविण्यासाठी उद्या चक्काजामचे आवाहन केले होते. दरम्यान बच्चू कडू आणि सरकार यांच्यात वाटाघाटी होवून बच्चू कडू यांनी उपोषण स्थगित केल्याने उद्या दिनांक १५ जून रोजी संपुर्ण राज्यात विविध शेतकरी व सामाजिक संघटना यांचेवतीने होणारे चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली.
यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले कि राज्य सरकारने शेतकरी कर्जमुक्तीसाठी समिती गठीत केलेली आहे. सात बारा कोरा करणा-या निर्णयास टाळाटाळ केल्यास राज्य सरकारला याची मोठी किंमत मोजावी लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमुक्तीसाठी समिती नेमण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे त्यांनी देशातील उद्योगपतींची कर्जे राईट ॲाफ करताना पंतप्रधान मोदींना व अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनाही समिती नेमण्याचा सल्ला द्यावा. लाडकी बहीणीसाठी वार्षिक ३६ हजार कोटी , शक्तीपीठ महामार्गासाठी ८६ हजार कोटी, बुलेट ट्रेन १ लाख ८ हजार कोटीचा चुराडा करत असताना कोणतीही समिती नेमली नाही मग शेतक-यांना कर्जमाफी करण्यासाठी समितीची नेमण्याची काय गरज होती.
केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे तसेच अस्मानी व सुल्तानी संकटाने राज्यातील शेतकरी कर्जबाजारी होवून आर्थिकदृष्ट्या पिचला गेला आहे. राज्यात दररोज ८ शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. सर्वाधिक आत्महत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या विदर्भात होत आहेत. यामुळे त्यांनी समिती नेमून व चालढकल करून राज्यातील आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या रक्ताने भिजलेले कफन डोक्याला बांधून राज्यभर फिरू नये. जर राज्यातील शेतक-यांची कर्जमुक्ती झाली नाही तर याच आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कपाळाचे कुंकू पुसलेल्या लाडक्या बहीणीचा शाप त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही.