Saturday, October 25, 2025
Homeऔरंगाबाद डिजिलॉकरमध्ये विजेची बिले उपलब्ध लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

 डिजिलॉकरमध्ये विजेची बिले उपलब्ध लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

 डिजिलॉकरमध्ये विजेची बिले उपलब्ध

लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला अशी महत्त्वाची कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सुरक्षित ठेऊन हवे तेव्हा उपलब्ध करून देणाऱ्या केंद्र सरकारच्या डिजिलॉकर या ऑनलाईन सुविधेमध्ये आता महावितरणची वीजबिलेही उपलब्ध झाली असून वीजग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी बुधवारी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून वीजग्राहकांना ‘इज ऑफ लिव्हिंग’च्या आधारे अधिकाधिक सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणने केंद्र सरकारच्या डिजिलॉकरशी वीजबिले जोडली आहेत. यामुळे वीज ग्राहकांना आपल्या मोबाईल फोनमध्ये डिजिलॉकर ॲपमध्ये ठेवलेल्या महत्त्वाच्या दाखल्यांसोबतच वीजबिलेही उपलब्ध होणार आहेत. त्यांना वीजबिल भरण्यासाठी तसेच गरजेनुसार हे बिल कोणाला पाठविण्यासाठी किंवा त्याचा प्रिंट काढण्यासाठी याचा उपयोग होईल.

डिजिलॉकर हा केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने डिजिटल इंडिया कार्यक्रमाच्या अंतर्गत सुरू केलेला महत्त्वाचा उपक्रम आहे. त्याचा वापर करून नागरिकांना आपले पॅन कार्ड, वाहन नोंदणी कागदपत्रे, रेशन कार्ड, दहावी मार्कशीट, बारावी मार्कशीट, निवासाचा दाखला असे अनेक दस्तऐवज ॲपमध्ये सुरक्षित ठेवता येतात आणि गरजेनुसार त्यांचा वापर करता येतो. सर्व दाखले मोबाईलच्या ॲपमध्ये ठेवलेले असल्याने ते सदैव सोबत उपलब्ध राहतात. देशात आतापर्यंत ५२ कोटी ८९ लाख नागरिकांनी डिजिलॉकरचा वापर सुरू केला असून त्यांनी त्यात ८५९ कोटी कागदपत्रे ठेवली आहेत. माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या नियमावलीनुसार डिजिलॉकरमधील दस्तऐवज मूळ कागदी प्रत्यक्ष दाखल्याच्या समान समजले जातात व त्याला कायदेशीर दर्जा आहे.

महावितरणने आपल्या संगणकीय व्यवस्थेतील बिलांची माहिती डिजिलॉकर सुविधेला उपलब्ध करून दिली आहे. वीजग्राहकाने आपल्या डिजिलॉकर ॲपमध्ये गेल्यानंतर महावितरण वीज कंपनीची निवड करून आपला वीज ग्राहक क्रमांक दाखल करण्याची कृती एकदाच करायची आहे. त्यानंतर त्या ग्राहकाला आपल्या डिजिलॉकरमध्ये विजेचे चालू महिन्याचे बिल उपलब्ध होईल.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments