तालुकास्तरीय मुख्याध्यापक कार्यप्रेरणा बैठक संपन्न
जिंतूर/प्रतिनिधी/ मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, शिक्षणाधिकारी (प्रा.) सुनील पोलास यांच्या संकल्पनेतून तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले यांनी उन्हाळी सुट्टीनंतर सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये “दर्जेदार पोषण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण” या निर्धारित उद्दिष्टाच्या साध्यतेसाठी सर्व मुख्याध्यापक बांधवांना प्रेरित करणे महत्त्वाचे आहे. मुख्याध्यापकांना समजून घेऊन त्यांच्या शैक्षणिक, प्रशासकीय समस्या सोडविणे हे आपले कर्तव्य आहे. असे समजून सर्व मुख्याध्यापकांशी संवाद साधण्याच्या हेतूने…. त्यांच्या कार्याला प्रेरणा देण्याच्या हेतूने…. नवीन शैक्षणिक सत्र सुरु होण्याच्या 15 दिवस आधी म्हणजे दिनांक 30 मे 2025 रोजी तालुकास्तरीय मुख्याध्यापक कार्यप्रेरणा बैठकीचे आयोजन श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर महाविद्यालय येथे करण्यात आले. शैक्षणिक गुणवत्तेविषयी प्रचंड तळमळ असणारे …. शैक्षणिक गुणवत्तेसाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे, शैक्षणिक गुणवत्तेचे प्रतिक समजले जाणारे संजय ससाणे शिक्षणाधिकारी (योजना) जिल्हा परिषद, परभणी यांच्या अध्यक्षतेखाली सदरची बैठक संपन्न झाली.
कार्यप्रेरणा बैठकीला संबोधित करताना शिक्षणाधिकारी संजय ससाणे यांनी सर्वांना आपल्या विचाराने प्रेरित केले. आपण सर्वजण ग्रामीण भागात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहात. या दैदीप्यमान पवित्र कार्यात मी आपल्या सोबत आहे. हे काम अधिक तन्मयतेने व गुणवत्तापूर्ण पद्धतीने व्हावे अशी मुख्य कार्यकारी अधिकारी महोदया यांची अपेक्षा आहे. म्हणून आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची वर्गनिहाय अध्ययन निष्पत्ती नुसार प्रगती करूयात. प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे मिळेल याचा आपण विचार करूयात…. यासाठी प्रयत्न करूयात. असे आवाहन करण्यात आले.
सर्व वर्गासाठी व सर्व विद्यार्थ्यासाठी अभ्यासगट तयार करने, इयत्ता पहिली सी बी एस ई अभ्यासक्रम लागु होत आहे. याचा प्रचार व प्रसार करणे. याप्रमाणे आपले अध्ययन अनुभव अधिक परिणामकारक करणे, मिशन स्कॉलरशिप, मिशन नवोदय व मिशन सर्व शालेय स्पर्धा परीक्षा, मिशन 9, 10 वी, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम, अध्ययन निष्पतीनुसार वर्ग प्रगत करणे, मुल भेट प्रपत्रानुसार शाळा भेटी करणे, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन(CCE), अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन ( भविष्यवेधी शिक्षण), मुक वाचन व प्रकट वाचन( दररोज सायंकाळी 3:45 ते 4:15 पर्यंत), we learn English( भाग 1 ते भाग 84 सकाळी 10:15 ते 10:45 वर्गात घेणे), प्रत्येक शनिवारी चला शिकुया प्रयोगातून विज्ञान ( परिपाठात व वर्गात), दर शुक्रवारी अंगणवाडी मध्ये संपर्क, चर्चा व अध्यापन करणे, स्वयंअध्ययन, सहाध्यायी अध्ययन, गटचर्चेतून अध्ययन, विषयमित्राच्या माध्यमातून अध्ययन अनुभव देणे, शाळा व्यवस्थापन समिती बैठक, वृक्षारोपण, उल्हास नवभारत कार्यक्रम, नवीन अभ्यासक्रमाचे महत्त्व सांगून इयत्ता पहिलीची व शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, आपल्या शाळेचा आणि प्रत्येक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावणे, प्रत्येक विद्यार्थाची गुणवत्ता वाढविणे यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे, नेहमी पालकांच्या संपर्कात राहणे, सर्व प्रशासकीय कामे वेळेत पूर्ण करणे, सर्व शालेय ऑनलाईन कामे वेळेत पूर्ण करणे यासारख्या विषयावर शिक्षणाधिकारी संजय ससाने व गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले यांनी सखोल मार्गदर्शन करून उपस्थित सर्व मुख्याध्यापकांना येणाऱ्या शैक्षणिक वर्षात पूर्ण क्षमतेने, उत्साहाने आणि आनंदाने काम करण्यासाठी प्रेरित केले. या कार्य प्रेरणा बैठकीत 31 मार्च, 30 एप्रिल व 31 मे रोजी सेवानिवृत्त झालेल्या सर्व शिक्षक बांधवांचा सेवापूर्ती सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालन साहित्यिक मयूर जोशी यांनी केले. यशस्वीतेसाठी शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानोबा साबळे, रावसाहेब कातकाडे, नारायण मुंडे, प्रभाकर नालंदे, सचिन चव्हाण, वैजनाथ प्रधान, नितीन पेठे,योगिता संगवई, रत्नमाला तोडकर यासह सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, साधनव्यक्ती, शिक्षक यांनी सहकार्य केले.
