तब्बल तीस वर्षानंतर भेटले वर्गमित्र
खुलताबाद /प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील गदाना येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू हायस्कूल गदाना प्रशालेमध्ये १९९८ साली दहावी वर्गात शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा मंगळवारी (दी. २७) पार पडला,या वेळी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा मिळाल्याने आणि आपल्या गुरुजनांच्या व वर्गमित्र मैत्रिणींच्या एक दिवसीय सहवासाने प्रत्येक जण भाऊक झाला होता.या कार्यक्रमासाठी न्यू हायस्कूल गदाना प्रशालेचे तात्कालीन शिक्षक व सध्याचे मुख्याध्यापक आर. आर. पवार, सेवानिवृत्त शिक्षक बापू वरकड, बाबासाहेब वाकळे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित येत आपल्या गुरुप्रती कृतज्ञता म्हणून गुरु पूजन केले, उपस्थित माजी विद्यार्थी व तात्कालीन शिक्षकांच्या मनोगतातुन तीस वर्षांपूर्वीच्या आठवणी जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहिल्या. माजी विद्यार्थ्यांनी स्नेह भेटीची आठवण म्हणून आपल्या शिक्षकांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात बॉटल्स पाम रोपांचे वृक्षारोपण केले. सर्वांच्या स्नेहभोजनाची व गुरुजनांच्या मार्गदर्शनाची व्यवस्था शाळेच्या प्रांगणात करण्यात आली होती, यावेळी पंचक्रोशीतील गदाना, गोळेगाव, सोनखेडा, सुलतानपूर, देवळाना, ममनापूर, बोरवाडी व इतर गावातील १९९८ च्या दहावी वर्गाच्या बॅचमधील ८० पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. स्नेह मिलन यशस्वीतेसाठी विजय चव्हाण, निलेश सोनवणे, असलम बेग (पानी फाऊंडेशन समन्वयक फुलंब्री) कैलास कछवा, ज्योती चव्हाण, गुलाब ठेंगडे आलिम शहा व सर्वच विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.
