विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचा वेबिनारद्वारे संवाद
नगरपालिका क्षेत्रात वार्ड भेट समस्या समाधान अभियानाच्या माध्यमातून
२२ मे रोजी सायंकाळी ४ वाजता संवाद
Ø आठही जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर :- मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यातील नागरी क्षेत्रातील नागरिक आपल्या वार्डातील अडचणी घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयात प्रशासकीय अधिकारी यांच्या भेटीसाठी, निवेदने देण्यासाठी येतात. मात्र विभागीय पातळीवरील अधिकारी अनेकदा कामानिमित्त दौऱ्यावर किंवा अन्य कामामुळे त्यांची भेट होत नाही, हीच बाब विचारात घेत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी नागरिकांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे थेट संवाद साधण्यासाठीचा उपक्रम हाती घेतला आहे. 22 मे रोजी सायंकाळी 4 वाजता नगरपालिका क्षेत्रात वार्ड भेट समस्या समाधान अभियानाच्या माध्यमातून नागरिकांशी विभागीय आयुक्त संवाद साधणार आहेत.
मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर येथे प्रशासकीय कामानिमित्त येण्यासाठी नागरिकांना होणारा त्रास थांबविण्यासाठी नागरिकांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे ‘संवाद मराठवाड्याशी’ अंतर्गत वॉर्ड समस्या समाधान अभियान या उपक्रमाची सुरूवात करण्याचा निर्णय विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी घेतला आहे. श्री. गावडे यांच्यासमवेत यावेळी नगरपरिषद सह आयुक्त देविदास टेकाळे, नगर प्रशासन विभागाच्या ॲलिस पोरे, संजय केदार उपस्थित असणार आहेत.
नागरिकांनी नगर विकास विभागाशी सबंधित योजना, प्रश्न, असलेल्या अडचणी, योजनेच्या अंमलबजावणीचे धोरण तसेच याबाबत असलेल्या अडचणीबाबत थेट विभागीय आयुक्त यांच्याशी संवाद साधता येणार आहे. नागरिकांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असे अवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबतचा लिंक व क्युआर कोडही प्रसिद्ध करण्यात येत आहे. नागरिकांना आपल्या मोबाईलव्दारे या उपक्रमात सहभागी होता येणार आहे.
