महानगर पालिकेने मान्सूनपूर्व कामे व्यवस्थितपणे अधिकाऱ्यांच्या देखरेखी खाली करून घ्यावीत; चंदनझीरा येथील नागरिकांची मागणी
जालना/ प्रतिनीधी / काल रविवारी जालना शहरासह परिसरामध्ये जोरदार वादळी वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे चंदनझीरा,सुंदर नगर,नागेवाडी, नॅशनल नगर या प्रभागामध्ये नाल्यांचे घाण पाणी रस्त्यावर येऊन अक्षरशः नागरिकांच्या घरात घुसले. पावसाळा सुरू होण्यास थोडेच दिवस असल्यामुळे महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने मान्सूनपूर्व कामासाठी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली नाल्यांची सफाई, कचऱ्यांची विल्हेवाट लावणे इत्यादी कामे करून घ्यावीत. नाहक नागरिकांना त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी. अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.मान्सूनपूर्व कामे जोरात चालू असून महानगरपालिका त्यासाठी तत्पर असल्याचे आयुक्तांच्या वतीने वारंवार सांगण्यात येत आहे परंतु सफाई कामगारांचे मनुष्यबळ कमी असल्यामुळे परिसरामध्ये नाल्यांची साफसफाई करण्यासाठी योग्य ती यंत्रणा राबविल्या जात नसल्याने वरवरची कामे करून मान्सूनपूर्व कामे होत असल्याचे दाखविण्यात येत आहे असे नागरिकांचा आरोप आहे. पावसाळ्यामध्ये नाल्यांचे पाणी घाण पाणी घरामध्ये घुसणे किंवा साचलेल्या कचऱ्यामधून दुर्गंधी येणे त्यासाठी वेगवेगळे साथीचे आजार बळावण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून महानगरपालिकेने पुढाकार घेऊन नागरिकांना योग्य त्या सोयी सुविधा द्याव्यात अशी मागणी आज दि.19 सोमवार रोजी दुपारी बारा वा. च्या सुमारास चंदनझीरा येथील जगन्नाथ अण्णा चव्हाण, लक्ष्मण घनवट यांच्यासह परिसरातील नागरिकांच्या वतीने होत आहे.