Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादस्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आवश्यक सुविधा निर्मितीला प्राधान्य -...

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आवश्यक सुविधा निर्मितीला प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आवश्यक सुविधा निर्मितीला प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

 

Ø आवश्यक मनुष्यबळ, पायभूत सुविधांसाठी लवकरच वैद्यकीय शिक्षण विभाग आणि वित्त विभागाची संयुक्त बैठक घेणार

Ø वैद्यकीय महाविद्यालयाच्या 50 वर्षपूर्ती निमित्त विविध सुविधा निर्मितीला निधी देणार

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे ग्रामीण भागात तालुक्याच्या ठिकाणी असलेले एक महत्वाची आरोग्य संस्था आहे. या संस्थेला ५० वर्षे पूर्ण होत असून याठिकाणी नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, पायाभूत सुविधा निर्मितीसाठी निधी दिला जाईल. या निधीतून प्राधान्यक्रम निश्चित करून आवश्यक सुविधा निर्मिती करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले.

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आयोजित आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे, आमदार विक्रम काळे, आमदार धनंजय मुंडे, आमदार नमिता मुंदडा, माजी आमदार संजय दौंड, अक्षय मुंदडा, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, आरोग्य सहसंचालक डॉ. शिल्पा दमकुंडवार, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बी. एम. थोरात यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पदवीपूर्व विद्यार्थी क्षमता १५० इतकी असून या प्रवेश क्षमतेसाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एनएमसी) निश्चित केलेल्या नियमानुसार आवश्यक पायाभूत सुविधा,  मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच वैद्यकीय शिक्षण विभाग आणि वित्त विभागाच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात येईल. तसेच आवश्यक कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या निधीतून करावयाच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यानुसार आराखडा तयार करावा. पायभूत सुविधांची निर्मिती करताना उपलब्ध जागेचा पुरेपूर आणि योग्य वापर होण्यासाठी तज्ज्ञ आर्किटेक्टची नेमणूक करावी. महाविद्यालयाच्या जमिनीवर झालेले अतिक्रमण हटवावे, तसेच पुन्हा अतिक्रमण होवू नये, यासाठी संपूर्ण परिसराला सुरक्षा भिंत बांधण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीचा अत्यावश्यक आणि दर्जेदार कामासाठी विनियोग करावा. औषधांच्या बाबतीत कोणत्याही तक्रारी येवू नयेत, याची काळजी घ्यावी. सध्या सुरू असलेली बाह्यरुग्ण विभाग, मुलांचे वसतिगृह आणि मुलींच्या वसतिगृहाचे काम उच्च दर्जाचे होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक खबरदारी घ्यावी, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या शंभर एकर क्षेत्रामध्ये मोकळ्या जागेत वृक्ष लागवड करावी, तसेच सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारावे.  महाविद्यालय  व रुग्णालयात, तसेच अधिकारी, कर्मचारी निवासस्थाने, वसतिगृहातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी वृक्ष लागवडीसाठी वापरावे. भौगोलिक परिस्थितीचा विचार करून परिसरात रुग्णांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.

वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांनी प्रारंभी महाविद्यालय व रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सुविधा, तसेच नव्याने आवश्यक सुविधांची माहिती दिली. उपस्थित लोकप्रतिनिधींनी यावेळी आपल्या सूचना मांडल्या.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments