नितीन गरुड यांना पीएच.डी.पदवी प्रदान
छत्रपती संभाजीनगर : सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागात कार्यरत असलेले प्रा.नितीन सूर्यकांत गरुड यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आंतरविद्या शाखेअंतर्गत नाट्यशास्त्र विषयातील विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली. प्रा.गरूड यांनी ‘१९८० पासून मराठी हौशी रंगभूमीवरील नाट्यकर्मींची होणारी मानसिक कोंडी : कारणे व त्यावरील उपाय’ (अ सायकॉलॉजिकल डिलेमा ऑफ मराठी अमॅच्युअर थिएटर अॅक्टिव्हिस्ट्स सिन्स १९८० : रिझन्स अँड रेमिडीज इन रिलेशन विथ थिएटर) या विषयावर संशोधन केले आहे.
संशोधन मार्गदर्शक डॉ.संजय पाटील देवळाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.नितीन गरुड यांनी शोधप्रबंध सादर केला होता. प्रस्तुत विषयावर २५ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या मुलाखतीद्वारे बाह्यपरीक्षक तज्ञांच्या शिफारशीनुसार विद्यापीठाने प्रबंध स्वीकारून त्यांना पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे.
मराठी हौशी रंगभूमीवर प्रा.नितीन गरुड यांनी मौलिक असे संशोधन केलेले आहे. येणाऱ्या पिढीतील रंगकर्मींना व नाट्य क्षेत्रातील संशोधकांना या प्रबंधाचा पथदर्शक म्हणून निश्चितच उपयोग होणार आहे. या संशोधनाबद्दल व पीएच.डी. ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्याबद्दल सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या नाट्यशास्र विभागाचे प्रमुख डॉ.किशोर शिरसाट, नितीन कडूपाटील, प्रसाद पोतदार, लोकरंग प्रतिष्ठानचे डॉ. दिलीप वाघ, ज्ञानेश्वर घोरपडे, दिलीप शिराळे, लातूर येथील दिनेश निलंगेकर, मिलिंद सरवदे, बालाजी अजगरे, दीपरत्न निलंगेकर, धनंजय पवार यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर प्रा.गरुड यांचे बंधू प्रा.दीपक गरुड, मातोश्री सुनंदा, पत्नी कुमुदिनी गरुड आणि प्रा.दिलीप महालिंगे व मित्रपरिवाराकडून अभिनंदन करण्यात येत आहे.