आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/अहंकारामुळे माणसाची प्रगती खुंटते त्यामुळे स्वताच्या विकासासाठी देवाला जर काही अर्पण करायचे असेल तर आपल्यातला अहंकार अर्पण करा असे आवाहन कथाकार समाधान महाराज शर्मा यांनी येथे बोलताना केले. गंगापूर येथील जिल्हा परिषद मैदानावर सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेचे तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी मा. नगराध्यक्ष संजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. समाधान महाराज पुढे म्हणाले की, वारकरी संप्रदाय हा जगात सर्वात मोठा संप्रदाय आहे. केलेले सत्कर्म व दानधर्म कधीही बोलून दाखवू नये त्यामुळे पुण्य कमी होउन पाप वाढते, शरिरात रग आहे तोपर्यंतच परमार्थ होतो.
महादेवाला केवळ बेलाचे पान वाहिल्याने किंवा तांबे भरून पाणी वाहिल्याने विद्यार्थी परीक्षेत पास होऊ शकत नाही त्यासाठी अभ्यास करावाच लागते. एखादे कार्य हातात घेतल्यावर ते असे करा की लोकांनी त्याची दखल घेतली पाहिजे. मुलगी नसेल तर दत्तक घ्या व कन्यादान करा, कन्यादानाला महत्व आहे, मुलींना जीव लावा, कितीही मित्र असले तरी वाईट वेळेत भाऊ हाच कामाला येतो, भावाविषयी प्रेम ठेवा, धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी निमंत्रणाची वाट पाहू नका, सुनेने सासु-सासऱ्यांची आई वडीलासमान सेवा करावी, सासुने सुनेला मुलीसारखी वागणूक द्यावी असे आवाहन यावेळी समाधान महाराज यांनी केले.
कार्यक्रमाची महाआरती अन्नदाते सचिन सोनवणे, व खंडागळे साहेब यांच्या हस्ते सपत्निक करण्यात आली. याप्रसंगी संतोष अंबिलवादे, कृष्णा पाटील, रामेश्वर नावंदर, निलेश बजाज, मुकुंद जोशी, विशाल दारूंटे, अमित मुंदडा, अनिल जाधव, बाबासाहेब लगड, सचिन मालपाणी, अमोल वरकड यांच्यासह सहा हजारपेक्षा अधिक भाविकांची उपस्थिती होती.