वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी ऑफलाईन प्रशिक्षणाच्या तारखेत बदल करण्यात यावा; शेख अब्दुल रहीम
बकरी ईद 7 जून रोजी असल्याने प्रशिक्षणाच्या तारखेत बदल करण्याची मागणी!
छत्रपती संभाजीनगर/ राज्यात सध्या वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी ऑफलाईन प्रशिक्षणाची चर्चा सुरू आहे आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुण्याच्या अधिकृत वेबसाइटवर वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण सर्व जिल्ह्यामध्ये एकाच टप्प्यात म्हणजेच 2 जून ते 12 जून 2025 दरम्यान सुरू होणार आहे. अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या अधिकृत वेबसाइटवर झळकत आहे. मुस्लिम समाजातील दुसरा मोठा सण म्हणजे बकरी ईद (ईद उल अज़हा) येत्या 7 जून रोजी आहे 7 ते 9 जून असे सलग तीन दिवस हा सण चालतो. मुस्लिम समाजामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो म्हणून हे प्रशिक्षण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अर्थातच 26 मे ते 4 जून 2025 पर्यंत सुरू करावे. किंवा बकरी ईद (7 जून) आणि दुसरा दिवस (8 जून) असे दोन दिवस प्रशिक्षणाला सुट्टी ठेवावी जेणेकरून मुस्लिम समाजातील शिक्षक बांधवांना हा सण साजरा करण्यात कोणतीही अडचणी येणार नाही व प्रशिक्षणही व्यवस्थित पार पडेल. अशा मागणीचे निवेदन मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे. यांना सादर करण्यात आले. निवेदनाची एक प्रत मा. प्रधान सचिव साहेब, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई. आणि मा. शालेय शिक्षण आयुक्त साहेब, शिक्षण आयुक्त कार्यालय, पुणे. यांनाही सादर करण्यात आली आहे. निवेदनावर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे राज्य प्रवक्ता तथा हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर यांची स्वाक्षरी आहे