कृतघ्न तुर्की, अझरबैजानवर भारताचे बहिष्कार अस्त्र
पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे भ्याड हल्ला करून २६ निष्पाप पर्यटकांना ठार केले. या भ्याड हल्ल्याने भारतात संतापाची लाट उसळली. या हल्याचा जगभर निषेध केला गेला. भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिन्दुर मोहीम राबवून पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांचे अड्डे नष्ट केले. ऑपरेशन सिन्दुर मोहिमेत भारतीय सैन्यदलाने शंभरहून अधिक जहाल दहशतवाद्यांना यमसदनी पाठवून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. भारताने ऑपरेशन सिन्दुर राबवताना फक्त दहशतवाद्यांना टार्गेट केले. भारताने पाकिस्तानी नागरिक किंवा सैन्यदलाला इजा पोहचवली नाही असे असतानाही पाकिस्तानने भारताच्या नागरी वस्तीवर आणि भारतीय सैन्यदलावर ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला अर्थात भारतीय सैन्यदलाने हा हल्ला परतावून लावतानाच थेट पाकिस्तानात घुसून पाकिस्तानचे हवाई अड्डे नष्ट केले. भारत पाकिस्तान दरम्यान सुरू झालेल्या या युद्धात कारण नसताना तुर्की आणि अझरबैजान या दोन देशांनी पाकिस्तानची बाजू उचलून धरली इतकेच नाही तर तूर्कीने थेट पाकिस्तानला लष्करी मदत करत पाकिस्तानला ड्रोन आणि इतर लष्करी साहित्य पुरवले. पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यासाठी जे ड्रोन पाठवले होते ते तुर्की या देशानेच दिले होते अर्थात भारताच्या भक्कम संरक्षण दलाने ते हवेतच भेदून टाकले. तुर्की या देशाने पाकिस्तानला मदत करताना थेट भारतावर टीका केली की भारतानेच पाकिस्तानवर हल्ला केला म्हणून त्यांनी पाकिस्तानला मदत केली. वास्तविक पाकिस्ताननेच दहशतवादी हल्ला घडवून आणला त्यामुळे पुढील संघर्ष निर्माण झाला हे संपूर्ण जग मान्य केले असताना तुर्की मात्र हे मान्य करायला तयार नाही याचा अर्थ पाकिस्तानने भारतात दहशतवादी कारवाया कराव्यात, आमच्या निष्पाप नागरिकांना मारावे आणि आम्ही ते निमूटपणे पाहत बसावे असे तूर्कीला सुचवायचे आहे का ? तुर्की प्रमाणेच अझरबैजान या देशाने ही पाकिस्तानला पाठिंबा देत भारतावर टीका केली. या दोन्ही देशांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला नाही मात्र भारतावर टीका करत पाकिस्तानला पाठिंबा दिला. या दोन्ही देशांचा हा कृतघ्नपणाच आहे. कारण या दोन्ही देशांना भारताने वेळोवेळी मदत केली आहे. या दोन्ही देशांना भारताने आपले मित्र राष्ट्र मानले आहे. या देशांनी मात्र भारताशी मैत्री निभावणे तर सोडाच पण भारताचा शत्रू असलेल्या पाकिस्तानला मदत करून भारताशीच शत्रुत्व पत्करले आहे. भविष्यात याचा त्यांना मोठा फटका बसणार हे निश्चित. २०२३ साली तुर्की आणि सीरिया या देशात मोठा भूकंप झाला होता. या भूकंपात तूर्कीची मोठी वित्त आणि जीवितहानी झाली होती. या भूकंपात तूर्कितील ५० हजारांहून अधिक नागरिक मरण पावले होते. तूर्किवर आलेल्या या नैसर्गिक संकटात भारताने आपली मैत्री निभावत तूर्किला अन्नधान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तू, औषधे यांचा पुरवठा केला. दुसऱ्या कुठल्या देशाच्या आधी भारताने या देशांना मानवी सहाय्य पुरवण्यासाठी धाव घेतली. त्यासाठी भारताने ऑपरेशन दोस्ती मोहीम राबवली. ऑपरेशन दोस्ती मोहिमेअंतर्गत भारताने तूर्कीला संकट काळात मदत केली त्यामुळे तेथील जनतेने भारताचे आभार मानले मात्र तेथील सरकारने काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला पाठींबा देत कृतघ्नपणा केला आणि आता युद्धात पाकिस्तानच्या बाजूने उभे राहून भारताशी शत्रुत्व पत्करले. दरवर्षी लाखो भारतीय तुर्कीला भेट देतात. त्यातून त्यांना वर्षाला तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो. अझरबैजान या देशातही लाखो भारतीय पर्यटक भेट देतात. त्यांची अर्थव्यवस्थाही भारतीय पर्यटकांवर अवलंबून आहे. या दोन्ही देशातून भारतात व्यापार चालतो. तुर्की या देशातून मोठ्या प्रमाणात फळांची आयत होते. तुर्की या देशातून येणाऱ्या सफरचंदाला भारतात मोठी मागणी आहे. तुर्की आणि अझरबैजान या देशात चित्रपट निर्माते, दिग्दर्शक चित्रपटांचे, मालिकांचे आणि वेबसिरिजचे चित्रीकरण करतात त्यातूनही त्यांना मोठा महसूल मिळतो आता या दोन्ही देशांनी जो कृतघ्नपणा केला त्यामुळे या दोन्ही देशांविरुद्ध भारतात संतापाची लाट उसळली असून या दोन्ही देशांना धडा शिकवण्यासाठी बॉयकॉट तुर्की अँड अझरबैजान ही मोहीम भारतात राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत भारतातील नागरिक या दोन्ही देशांवर बहिष्कार टाकत आहेत. बॉलिवूडने तुर्की आणि अझरबैजान या दोन्ही देशात चित्रीकरण करण्यास नकार दिला असून या देशांवर बहिष्कार टाकला आहे. पर्यटक व्यावसायिकांनीही या दोन्ही देशातील आपले बुकिंग रद्द करून त्यांच्यावर बहिष्कार टाकला आहे. व्यापाऱ्यांनीही तूर्कितून येणाऱ्या वस्तूंवर बहिष्कार टाकला आहे. भारताचे हे बहिष्कार अस्त्र या दोन्ही देशांच्या मुळावर येणार आहे. भारतीय नागरिकांनी या दोन्ही देशांवर टाकलेल्या या बहिष्कार अस्त्राने या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था गोत्यात येऊ शकते. असंगाशी संग केल्याचा परिणाम या दोन्ही देशांना भविष्यात भोगावा लागणार आहे.