कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकलीच्या मृत्यू प्रकरणी SDPI चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
आयुक्त,सह आयुक्त आणि स्वच्छता निरिक्षकावर कारवाईची मागणी
SDPI ने गांधीनगर येथे पिडीत कुटुंबाची घेतली भेट..
जालना /प्रतिनीधी /जालना शहरातील गांधी नगर परिसरात घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण शहराला हादरवून गेली आहे. दिनांक ६ मे २०२५ रोजी मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ८ वर्षांची निर्दोष मुलगी संध्या प्रभुदास आठोळे गंभीर जखमी होऊन मृत्यू झाली आहे. या घटनेनंतर आज दि.08 गुरुवार रोजी दुपारी दोन वा. च्या सुमारास सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया जालना शिष्टमंडळाने पीडित कुटुंबाला भेट देऊन त्यांचे सांत्वन केले आणि जिल्हाधिकारी कार्यालयात एक निवेदन सादर करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
यावेळी पक्षाचे जिल्हा समिती सदस्य खुर्रम आदिल खान यांनी म्हटले की, जालना शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे, नागरिक त्रस्त आहेत, तक्रारी सुरूच आहेत – पण प्रशासन झोपलेले आहे.
महानगरपालिकेच्या आयुक्त, उपआयुक्त आणि स्वच्छता निरीक्षक यांच्याविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा.मृत बालिकेच्या कुटुंबाला तात्काळ नुकसानभरपाई द्यावी.
SDPI ने जाहीर केले आहे की, जर प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर जनहितासाठी कायदेशीर आणि लोकशाही मार्गांनी आंदोलन छेडले जाईल.
यासंदर्भात SDPI च्या वतीन पुढील प्रमाणे मागण्या केल्या आहेत. भास्तीय न्याय संहिता कलम 106 निष्काळजीपणामुळे मृत्यू होणे. कलम 270 सार्वजनिक उपद्रव निर्माण करणे, कलम 125. 125(a) व 125 (b) सावधगिरी न बाळगल्यामुळे मानवाला इजा मृत्यू होणे व इतर संबंधित कायदेशीर कलम व तरतुदींनुसार जालना महानगरपालिकेचे आयुक्त, उपआयुक्त व स्वच्छता निरीक्षक यांच्याविरुद्ध तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात यावेत.
मृत अल्पवयीन मुलीच्या पालकांना शासनाच्या नियमानुसार व मानवी दृष्टीकोनातून तात्काळ नुकसानभरपाई मंजूर करण्यात यावी.
जालना महानगरपालिकेचे आयुक्त यांना तात्काळ निलंवित करून त्यांच्यावर विभागीय चौकशी करण्यात यावी, जेणेकरून प्रशासकीय निष्काळजीपणास प्रोत्साहन मिळणार नाही.
शहरामध्ये वाढत असलेल्या मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी तात्काळ प्रभावी उपाययोजना सबविण्याचे आदेश मा. जिल्हाधिकारी साहेवांनी जालना महानगरपालिकेला द्यावेत.
जर या निवेदनाच्या दिनांकापासून पुढील १५ दिवसांच्या आत महानगरपालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांवर आवश्यक उपाय केले नाहीत, तर सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया, जालना आपला स्वर्वाने शहरातील मोकाट कुत्रे पकडून महानगरपालिका कार्यालयात्या परिसरात आणून सोडेल, आणि हे लक्षवेधी आंदोलन म्हणून करण्यात येईल.
या घटनेची स्वतंत्र व निष्पक्ष न्यायिक चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांची प्रशासकीय व फौजदारी जबाबदारी निश्चित करण्यात यावी.
शहरात मोकाट प्राण्यांचे शास्त्रीय पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी दीर्घकालीन धोरण तयार करण्यात यावे व त्याची अंमलबजावणी करण्यात यावी:
ही घटना केवळ एका कुटुंबावर आलेली आपत्ती नसून, संपूर्ण नागरी समाजाच्या सुरक्षिततेसाठी गंभीर इशारा आहे. म्हणून आम्ही आपणास विनंती करतो की, या निवेदनातील मागण्यांवर तात्काळ व प्रभावी निर्णय घेऊन न्याय प्रस्थापित करण्यात यावे. जर या प्रकरणी तातडीने कार्यवाही करण्यात आली नाही, तर आम्ही सामाजिक व कायदेशीर मार्गांनी आंदोलन करण्यास बाध्य राहील.असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देता वेळी इरफान खान, खुर्रम खान , मसूद बागवान, सय्यद कलीम, वसीम शेख, मोहम्मद अखलाक, शेख मुस्तकीम, कलीम शेख , अजीम शेख, शेख उज़ेफ, व इतर यांची उपस्थिती होती.