Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादवीजबिलावर राहणार ग्राहकांचे नियंत्रण

वीजबिलावर राहणार ग्राहकांचे नियंत्रण

वीजबिलावर राहणार ग्राहकांचे नियंत्रण

छत्रपती संभाजीनगर परिमंडलात बसवले 56 हजार टीओडी मीटर

छत्रपती संभाजीनगर : महावितरणतर्फे अत्याधुनिक असे टीओडी (टाइम ऑफ डे) मीटर वीजग्राहकांकडे बसवले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना आपल्या वीजवापराची माहिती दर तासानुसार (रिअल टाइम) उपलब्ध होणार आहे. ग्राहकांचे वीजवापरावर व पर्यायाने वीजबिलावर नियंत्रण राहणार असून, अचूक व वेळेत बिल मिळणार आहे. हे मीटर पोस्टपेड असून मीटर रीडिंगनुसारच बिल देण्यात येणार आहे. ग्राहकांवर कोणताही खर्चाचा बोजा न टाकता बसवण्यात येणारे हे मीटर त्यांच्या फायद्याचेच आहेत. त्यामुळे या मीटरबाबत पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

छत्रपती संभाजीनगर परिमंडलात सध्या नवीन वीज जोडणी व सौरऊर्जा ग्राहकांसाठी टीओडी मीटर बसवण्यात येत आहेत. तसेच जुने मीटर बदलून त्याजागीही टीओडी मीटर बसवले जात आहेत. टीओडी मीटरमध्ये कम्युनिकेशन पोर्ट असून ते महावितरणच्या सर्व्हरला जोडलेले असल्याने मीटरचा रिअल टाइम डाटा उपलब्ध होतो. मीटर नादुरुस्त झाल्याची माहिती त्वरित मिळू शकेल. या मीटरचे रीडिंग ऑटोमॅटिक होणार आहे. यात मानवी हस्तक्षेपाला कोणताही वाव नाही. त्यामुळे ग्राहकांना अचूक व वेळेवर बिले मिळतील. हे अत्याधुनिक मीटर असल्याने प्रत्येक युनिटची रिअल टाइम माहिती ग्राहकास मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वीज वापरानुसार रीडिंग येते याची खात्री ग्राहकाला करता येणार आहे. मीटरसाठी ग्राहकांवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. ही केंद्र सरकारची योजना असल्याने मीटर बसवण्यासाठी केंद्राने निधी दिला आहे. टीओडी मीटरमुळे महावितरणची वाणिज्य‍िक हानी कमी होईल तसेच वीजचोरीवर नियंत्रण येणार आहे. त्यामूळे होणाऱ्या महसूल वाढीतून अधिकाधिक चांगली सेवा महावितरण देऊ शकेल.

सध्या महावितरणने सर्व औद्योगिक ग्राहकांना टीओडी मीटर बसवलेले आहेत. त्यानुसार विशिष्ट कालावधीत वीज वापरासाठी महावितरणकडून औद्योगिक ग्राहकांना सवलत मिळते. याच धर्तीवर टीओडी मीटर बसवेलल्या घरगुती ग्राहकांना विशिष्ट वेळी वीजवापर केला तर सवलत देण्याचे प्रस्ताव महावितरणने विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलेला आहे. यात ग्राहकांचाच फायदा होईल. तसेच हे मीटर बसवल्याचा प्रचलित वीजदरांवर कोणताही परिणाम होणार नाही.

         सध्या महावितरण, महापारेषणसह सर्व शासकीय कार्यालये व निवासस्थाने, मोबाईल टॉवर ग्राहकांकडे टीओडी मीटर बसवण्यात आले आहेत. हे मीटर बसवण्यासाठी ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडलात आतापर्यंत 56 हजार 940 ग्राहकांकडे टीओडी मीटर बसवण्यात आले आहेत. यात नवीन वीजजोडणीच्या 21 हजार 944 मीटरचा समावेश आहे. 27 हजार 836 ग्राहकांचे जुने मीटर बदलून त्या जागी टीओडी मीटर बसवले आहेत, तसेच पीएम-सूर्यघर योजनेत छतावर सौर ऊर्जा संच आस्थापित केलेल्या 7 हजार 160 ग्राहकांनाही टीओडी मीटर बसवले आहेत.

अत्याधुनिक टीओडी मीटरमुळे ग्राहकांना आपल्या वीजवापराची रिअल टाइम माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच ऑटोमॅटिक रीडिंगमुळे अचूक  व वेळेत बिल मिळणार आहे. ग्राहकांनी कोणताही गैरसमज न बाळगता टीओडी मीटर बसवण्यासाठी सहकार्य करावे

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments