विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे पुन्हा वाढणार
आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव / जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांना बालभारतीकडून नव्याने पुस्तक मिळणार आहेत.आता पूर्वीप्रमाणेच प्रत्येक विषयाची स्वतंत्र पुस्तके दिली जाणार आहेत.तशी मागणी जिल्हा परिषदने नोंदविली असून ती स्वतंत्र पुस्तके विद्यार्थ्यांना मिळणार असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे त्यामुळे पुन्हा वाढणार आहे.सोबतच राज्य सरकारने गणवेशाबाबतचे धोरण बदलवून शाळांनाच यापुढे गणवेश खरेदी करावा लागण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारकडून पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुरविली जातात.गेल्या वर्षी विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्याच्या हेतूने मोजक्याच पुस्तकात सर्व विषय सामावून घेण्यात आले होते.परंतु यंदा हा नवा प्रयोग बंद होणार आहे.विद्यार्थ्यांना यापुढे पूर्वीप्रमाणेच पुस्तके पुरविली जाणार आहे. तशी मागणी जिल्हा परिषदेने नोंदविली आहे.शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच बालभारतीकडे तशी पोर्टलद्वारे मागणी नोंदवावी लागते.त्यानुसार ही नोंद करण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
चौकट ;
‘अडचणीमुळे निर्णय फिरवीला.’
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याच्या हेतूने मोजकीच पुस्तके देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.परंतु तो निर्णय फिरविण्यात आला आहे.यापुढे विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाची वेगळी पुस्तके दिली जाणार आहेत.एकत्रित पुस्तकाचा प्रयोग यशस्वी झाला नसल्याचे शिक्षण विभागातील जाणकारांचे मत आहे.पुस्तकात मागील बाजूस वह्याची पाने लावली जात होती,ती पुरेशी नव्हती.यासह विविध अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले.त्यानुसार तो निर्णय रद्द करण्यात आल्याचे समजते.
चौकट ;
‘शालेय गणवेशही शाळांकडेच…’
गणवेशाबाबतही राज्य सरकारने धोरण बदलले आहे.मागील वर्षी राज्यात एकाच कंपनी मार्फत गणवेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता,मात्र हा प्रयोग सपशेल अपयशी झाला आहे.काही ठिकाणी तर शेवटपर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही,ज्यांना मिळाला तो चांगला नव्हता, मापाचा नव्हता.अशा तक्रारी आल्या होत्या.पूर्वी शाळा स्तरावर शालेय व्यवस्थापन समितीच्या मदतीने मुख्याध्यापक गणवेश खरेदी करत.पुस्तकाप्रमाणेच गणवेशाच्या निर्णयाची पुनरावृत्ती झाली आहे.तो गणवेश पण आता शाळांनाच खरेदी करावा लागण्याची शक्यता आहे.