आंतरजातीय विवाह केलेल्या १४० जोडप्यांना अनुदान वितरीत
छत्रपती संभाजीनगर – आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य देण्याची योजना समाजकल्याण विभागामार्फत चालविली जाते. जिल्ह्यात असे १४० लाभार्थी जोडपे होते. त्यांना प्रति जोडपे ५० हजार रुपये या प्रमाणे ७० लाख रुपयांचा लाभ वितरीत करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी साहेबराव चव्हाण यांनी दिली आहे.
समाज कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनेत जिल्ह्यात १४० लाभार्थी पात्र होते. त्यांना लाभ देण्यासाठी ७० लक्ष रुपयांची तरतूद प्राप्त झाली होती. ७२ लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली होती. मात्र ५६ लाभार्थ्यांचे ॲप्रुव्हल दि.३१ मार्च रोजी कालबाह्य झाले होते व १२ लाभार्थ्यांना बॅंकेकडून ॲप्रुव्हल मिळाले नसल्याने ६८ लाभार्थ्यांच्या लाभाची तरतूद शासनास परत गेली होती. तथापि, प्रादेशीक उपायुक्त दीपक खरात, आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना याबाबत समाज कल्याण अधिकारी साहेबराव चव्हाण यांनी माहिती दिली. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आदेश निर्गमित करुन उर्वरीत ६८ लाभार्थ्यांचे अनुदान ३४ लाख रुपये तात्काळ पुन्हा अनुदान वितरीत करण्यात आले. आता या सर्व १४० लाभार्थ्यांना लाभाचे वितरण झाले आहे.
