महाराष्ट्र ग्रामीण बँक आग प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना ठोकल्या बेड्या
कागदपत्रे जाळण्यासाठी माजी उपसरपंच भरत कदमने साथीदारांसह रचले कुंभाड
वैजापूर /प्रतिनिधी/ शहरात तीन दिवसांपुर्वी (२० एप्रिल) रोजी घडलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या आग प्रकरणात पसार झालेल्या सहा जणांपैकी पाच जणांना छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केवळ चोवीस तासातच बेड्या ठोकल्या. यातील आप्पा बालाजी बने राहणार अंधोरी जिल्हा लातूर हा आरोपी पसार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या प्रकरणातील माजी उपसरपंच असलेला
आरोपी भरत शिवाजी कदम राहणार विरगाव तालुका वैजापूर याने महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून खोटे कागदपत्रे दाखल करुन सरकारी पैशांवर डल्ला मारल्याने त्याच्यावर विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याचा राग मनात धरून साथीदारांच्या मदतीने त्याने बँक जाळण्याचे कुंभाड रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
अक्षय ज्ञानेश्वर कराळे (२८) राहणार करंजगाव, सचिन सुभाष केरे (२५), वैभव उर्फ गजू पंढरीनाथ केरे (२७) दोघे राहणार गवळी शिवरा तालुका गंगापूर व धारबा बळीराम बिराडे (३१) राहणार अंधोरी अशी या प्रकरणातील अन्य चार आरोपींची नावे आहेत.
पोलीस अधिक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पळ पोलीस अधिक्षक डॉ. अन्नपुर्णा सिंह यांच्या.मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ, एपीआय पवन इंगळे, हवालदार भागिनाथ आहेर, विठ्ठल डोके, वाल्मिक निकम, शिवानंद बनगे, अशोक वाघ, दिपक सुरोशे, राहुल गायकवाड ,योगेश.तरमाळे.यांच्या पथकाने ही कामगिरी फत्ते केली.
बँकेत चोरी करण्याच्या प्रयत्न करत असताना अचानक स्फोट झाला अन् बँकेचे शटर उडून रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडी वर येऊन पडले. त्यामूळे चोरट्यांना गाडी तेथेच सोडून पळ काढावा लागला. उभ्या असलेल्या गाडीत पोलिसांना काही नंबर प्लेट सापडल्या त्यातील एका नंबर
प्लेटचा (एम एच ०४ डी.डब्ल्यू ४५११) धागा पकडत त्याअनुषंगाने तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी तपास केला असता
ही कार मालेगाव (साई.अँटो कन्सलटिंग) येथून विक्री झाल्याचे कळाले. मात्र हा व्यवहार करतांना आरोपींनी चलाखी करत कार खरेदी करणाऱ्याचे नाव चूकीचे दाखवले.पोलीसांनी याबाबत गोपनिय व तांत्रीक माहितीच्या आधारे आधी करंजगाव येथून अक्षय ज्ञानेश्वर कराळे (२८) राहणार करंजगाव यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने भरत कदम व अन्य साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे कबूल केले.