शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी अनिवार्य;
कृषी योजनांसाठी ओळख क्रमांक आवश्यक
जालना :- शासनाच्या कृषी विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये राज्यातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कृषी योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य करण्यात आले आहे. तरी शेतकरी बांधवांनी तात्काळ फार्मर आयडीसाठी जवळच्या ग्राम कृषी विकास समित्या तसेच सीएससी केंद्र येथे नोंदणी करुन कृषी विभागांच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
शासन निर्णयानूसार दि.15 एप्रिल 2025 पासून कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. फार्मर आयडी अनिवार्य असल्याने सर्व संबंधित पोर्टल, संकेतस्थळे आणि ऑनलाईन प्रणालीमध्ये तांत्रिक सुधारणा करुन समन्वय साधण्याचे निर्देश कृषी आयुक्त यांना देण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केली नाही त्या शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करुन घ्यावी. यासाठी ग्राम कृषी विकास समित्या, सीएससी केंद्रे तसेच क्षेत्रीय यंत्रणांची मदत घेण्यात यावी. असेही कळविले आहे.
