Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादपाचशे वीजचोरांना दणका

पाचशे वीजचोरांना दणका

पाचशे वीजचोरांना दणका

महावितरणची जालना जिल्ह्यात धडक कारवाई

जालना : महावितरणने जालना जिल्ह्यात वीजचोरीविरोधात उघडलेल्या धडक मोहिमेमुळे खळबळ उडाली आहे. गेल्या पंधरवड्यात अभियंते व कर्मचाऱ्यांनी तब्बल 489 वीजचोऱ्या पकडल्या आहेत. जिल्ह्यांत सर्व तालुक्यांत एकाच वेळी वेगवेगळ्या पथकांनी केलेल्या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.

             जालना जिल्ह्यात वीजगळतीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे महावितरणचे नुकसान होतेच, शिवाय वीजचोरांमुळे वाहिन्यांवर भार येऊन वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अधिकृत वीजजोडणी घेणाऱ्या ग्राहकांनाही फटका बसतो. हे लक्षात घेऊन वीजचोरीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात महावितरणच्या भरारी पथकांसह स्थानिक कार्यालयांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकाचवेळी कारवाई करण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी दिले. त्यानुसार अधीक्षक अभियंता संजय सरग यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते, तंत्रज्ञांनी आठही तालुक्यांत ही मोहीम राबवली.

1 एप्रिल ते 4 एप्रिलदरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरातील तीन व जालना, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिवचे प्रत्येक पथक तसेच अंबड, घनसावंगी व परतूर तालुक्यातील स्थानिक अभियंते, कर्मचाऱ्यांनी जालना-2 विभागांतर्गत परतूर, आष्टी, अंबड, जामखेड, वडीगोद्री या गावांत शहरात वीजचोरी पकडण्याची मोहीम राबवली. यात 253 जणांनी आकडे टाकून, मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केल्याचे आढळून आले. या सर्वांनी 2 लाख 47 हजार 433 युनिट वीजचोरी केली. त्यांना 37 लाख 80 हजार रुपयांची वीजचोरीची निर्धारित बिले देण्यात आली. 15 ते एप्रिल 18 एप्रिलदरम्यान शहागड, धाकलगाव, सौंदलगाव, सुखापुरी या गावांत केलेल्या कारवाईत 63 जणांनी साडेआठ लाख रुपयांची 354 हजार 400 युनिट वीज चोरून वापरल्याचे आढळले.

जालना-1 विभागांतर्गत 15 ते 18 एप्रिलदरम्यान भोकरदन शहरासह तालुक्यातील पिंपळगाव थोटे, आलापूर, कुंभारी, दगडवाडी, जाफ्राबाद शहरासह तालुक्यातील माहोरा, खानापूर, भातोडी, बदनापूर शहरासह तालुक्यातील दाभाडी, बाजार वाहेगाव, सेलगाव, गेवराई बाजार. जालना शहरासह तालुक्यातील विविध गावांत केलेल्या कारवाईत 173 जणांनी 15 लाख 30 हजार 160 रुपयांची 82 हजार 606 युनिट वीजचोरी केल्याचे आढळून आले.

महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यात यापुढेही ही धडक कारवाई सुरूच राहणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शहर आणि गावात कोणत्याही दिवशी महावितरणचे पथक अचानक धाड टाकून वीजचोरी पकडणार आहे. महावितरणच्या या कारवाईमुळे वीजचोरांत धडकी भरली आहे. ज्या ज्या गावात आकडे टाकून वीजचोरी होतेय, ती सर्व गावे आकडेमुक्त करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. तसेच मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करणाऱ्यांवर महावितरणचे बारीक लक्ष आहे. त्यामुळे अधिकृत वीजजोडणी घेऊनच वीजवापर करावा, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments