Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबाद भाषा ही संस्कृतीची आस्था असल्याने तीचा धर्माशी काहीही संबंध नाही.

 भाषा ही संस्कृतीची आस्था असल्याने तीचा धर्माशी काहीही संबंध नाही.

प्रति, माननीय संपादकजी,
            भाषा ही संस्कृतीची आस्था असल्याने तीचा धर्माशी काहीही संबंध नाही.
भारतातील प्रत्येक भाषा संस्कृतीच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या आहेत; ज्याप्रमाणे गंगा,यमुना,कावेरी,गोदावरी, तापी, कृष्णा, नर्मदा इत्यादी अनेक नद्यांच्या सोज्वळ आणि निर्मळते मधुनच भारतीय भाषेचा उगम झाला आहे.त्यामुळे त्याला धर्माशी जोडता येणार नाही.आपण जगात कुठेही जा परंतु भारतीय संस्कृती,भाषा,वेगवेगळे रहाणीमान, खानपान, व्यंजनाचे वेगवेगळे प्रकार या संपूर्ण परंपरा हजारो वर्षांपासून भारतातुनच निर्माण झालेले वटवृक्ष आहे आणि तीच परंपरा आताही सुरूच आहे.भाषा ही विचारांच्या देवाणघेवाणीचे एक मोठे माध्यम आहे.तिच्या माध्यमातून विविध आचार-विचार आणि श्रध्दा असलेले लोक जोडले जातात.ती त्यांच्या विभाजनाचे कारण बनू नये,अशी अपेक्षा व्यक्त करत नगरपरिषदेच्या क्षेत्रात राहणारे लोक किंवा लोकांचा समूह उर्दू भाषेशी परिचित असेल तर किमान नगर परिषदेच्या फलकावर अधिकृत भाषेव्यतिरिक्त म्हणजेच मराठी व्यतिरिक्त उर्दू वापरल्यास कोणताही आक्षेप नसावा असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.भारतात अनेक धर्मांचे लोक रहातात.त्यामुळे भाषा आणि धर्म याचा कुठेही संबंध जुळुच शकत नाही.कारण भारतात २८ राज्य व ८ केंद्रशासित प्रदेश आहेत त्या-त्या अनुषंगाने भाषेचे सुध्दा वर्णन होत असते. उदाहरण द्यायचे झाले तर महाराष्ट्रांतील मराठी, गुजरात मधील गुजराती, तामिळनाडू मधील तामिळ अशा प्रकारे प्रत्येक राज्यात भाषेचे आगळेवेगळे रूप दिसुन येते व त्याची गणना समाजामध्ये होते.त्याचप्रमाणे उर्दू भाषेचा जन्म सुद्धा भारतातील आहे तिचा धर्माशी काहीही संबंध नाही.इंग्रजी भाषा ही इंग्रजांनी भारतावर लादलेली भाषा आहे.त्यामुळे इंग्रजी भाषा सोडली तर भारतातील संपूर्ण भाषांची नाळ भारतभूमीतच गाडली आहे. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपरिषदेतील फलकावर उर्दू भाषेच्या वापराला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली “उर्दू भाषा हा धर्म नाही.ही लोकांमध्ये फूट पाडण्याचे कारण बनू नये.उर्दू हे गंगा-यमुना संस्कृती (गंगा-जमुनी तहजीब) किंवा हिंदुस्थानी संस्कृतीचे उत्तर उदाहरण आहे, असे हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.भाषा म्हणजे कोणताही धर्म नाही ती धर्माचे प्रतिनिधित्वही करीत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. भाषा म्हणजे एखाद्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप आहे.उत्तर आणि मध्य भारतातील मैदानी भागांचे मिश्र सांस्कृतिक स्वरूप असलेल्या गंगा-यमुना संस्कृती किंवा हिंदुस्थानी तहजीबचे उत्तम उदाहरण असलेल्या उर्दूच्या बाबतीतही हेच आहे.सर्वोच्च न्यायालय म्हणतो की, उर्दू ही भारतासाठी परकी आहे, या गैरसमजातून उर्दूविषयीचा पूर्वग्रह निर्माण झाला आहे.उर्दू हीदेखील मराठी आणि हिंदीप्रमाणेच इंडो-आर्यन भाषा आहे व या भूमीत जन्माला आलेली ही भाषा आहे अशा स्पष्ट शब्दात सांगितले.भाषेचा विरोधच करायचा असेल तर इंग्रजी भाषेचा करावा आणि करायला पाहिजे. कारण देशातील इतर भाषांना इंग्रजी भाषा पोखरत असुन देशात घर करण्याचा प्रयत्न करीत आहे याकडे भारतीयांनी लक्ष देण्याची गरज आहे. आज भारतातील प्रत्येक राज्यातील वेगवेगळ्या भाषेचा गोडवा पहायला मिळतो.याहीपलीकडे आपण गेलो तर प्रत्येक राज्याच्या ४० किलोमीटर अंतरानंतर आपल्याला तेथील भाषा,रहनसहन आणि संस्कृती यांचेही आगळेवेगळे दर्शन होते.म्हणजे इंग्रजी भाषा सोडली तर भारतातील प्रत्येक भाषा हिंदुस्थानच्या रक्तात आणि नसानसामध्ये दिसून येते.त्यामुळे उर्दू भाषा भारतीयांसाठी नवीन नसुन ती आपलीच आहे हेही लक्षात ठेवले पाहिजे. भारतातील प्रत्येक भाषा ही दैवी देण असुन ती सर्वांनीच स्विकारली पाहिजे.कारण हिंदू,बौद्ध,शिख, ईसाई, मुस्लिम या संपूर्ण धर्मांच्या साधुसंतांनी, महाज्ञानी, तपस्वी यांच्या परिश्रमातूनच भारतातील प्रत्येक भाषेचा उगम झाला आहे व ते सर्वांचेच श्रध्दा स्थान आहे.त्यामुळे भारतातील कोणतीही भाषा धर्माशी जोडली जावू शकत नाही.भाषा ही ईश्वरी देण आहे तीचा आदर व्हायलाच पाहिजे.त्याचप्रमाणे देशातील प्रत्येक राज्यांनी आपापल्या राज्यातील भाषेचा वापर जास्तीत जास्त करावा यामुळे प्रत्येक राज्यातील मातृभाषा सुरक्षित राहील.कारण मातृभाषा ही कोणाही कडून शिकविली जात नाही ती जन्मताच अवगत होत असते म्हणूनच तिला मातृभाषा म्हटल्या जाते.त्यामुळे देशातील संपूर्ण भाषा, मातृभाषा आणि राष्ट्रीय भाषेचा आदर सर्वांनीच केला पाहिजे.यामुळे देशातील संपूर्ण भाषा व बोली सुरक्षित राहील.जय हिंद!
-‌ रमेश कृष्णराव लांजेवार
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments