जवखेडा येथील निधी अभावी रस्ता रखडला
कन्नड /प्रतिनिधी / कन्नड तालुक्यातील जवखेडा बु. येथील जिल्हा परिषद शाळा महादेववाडी येथील शालेय विद्यार्थ्याना पाठीवर दप्तराचे ओझे घेवुन चिखलवाट तुडवित शाळा गाठावी लागत असल्याने’चिखलाचा तुडवित रस्ता,शाळेला चल माझ्या दोस्ता असे म्हणण्याची वेळ आली असुन,याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
जवखेडा बु. येथील बहूतांशी लोकांनी आपल्या सोयीनुसार वस्त्याजवळ घरे बांधली आहे.येथील महादेववाडी वस्तीत जवळपास दहा ते पंधरा कुटुंब राहतात.ही शाळा गावापासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर असुन,या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी गावातुन शाळेत जावे लागते.हा रस्ता जवखेडा बु. गावातून सुरुवात होवून गौरपिंप्री ते पिशोर रस्त्याला मिळतो.या रस्त्याची जवळपास वीस वर्षापुर्वी खडीकरण झाले आहे.त्यानंतर मात्र,या रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असुन,पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल होत असल्याने या रस्त्याने दुचाकीही जात नाही.त्यामुळे जवखेडा गावातील पन्नास विद्यार्थ्यांना चिखलातुन वाट काढत शाळा गाठावी लागत आहे.ऐनवेळी एखादा व्यक्ती आजारी पडल्यास त्यास दवाखाण्यात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.तसेच या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने पावसाचे पाणी साचत असल्याने अनेकवेळा दुचाकी घसरुन अपघात होतात.गावातील नागरिकांनी अनेकवेळा या रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या मागणीकडे स्थानिक राजकिय ,लोकंप्रतिनिधी व प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे. सध्या या रस्ता कामाचे वर्क ऑर्डर निघून केवळ निधीअभावी रखडल्याची चर्चा आहे .
तसेच मागील आमदाराचे काम थांबवल्याची कार्यकर्ते ओरड करीत आहे . या राजकीय पदाधिकाऱ्यांनी आपआपसात राजकारण करावे पण प्रजेला वेठीस धरु नये जनतेचा भ्रमनिरास न करण्याचे शेतकरी राजाने याकामी साकडे घातले आहे . रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम मंजूर झाले म्हणतात;डांबरीकरण तर दूरच,कित्येक वर्षापासून साधी दुरुस्ती देखील झालेली नसल्याची खंत नागरीकात होत आहे .