उघडे संसदेचे द्वार हेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार
भारत देशाचा इतिहास बघितला तर चातुर्वण व्यवस्थेपासुन तर बळकट अशा जातीव्यव्यवस्थे पर्यंत विषमता व द्वेषावरच अवलंबून आहे. चातुर्वण व्यवस्था जातीव्यव्यवस्थे मध्ये रुपांतरीत करून माणसाला माणसा पासुन दुर करून, त्यांच्या जिवनात विषमता, द्वेष, मत्सर, अंधविश्वास, पाखंड पेरून माणसाला विकासाचे, सामाजिक उन्नतीचे सर्व दरवाजे बंद केल्या गेले. मानसाचे मानवी, वैचारिक स्वातंत्र्य हिसकावून त्यामध्ये निव्वळ अंधविश्वास व विषमतेतुन द्वेष पेरून माणसाला राजसत्ता, धर्मसत्ता, अर्थसत्तेपासुन दुर ठेवण्यात आले. विषमतेचे दाहक चटके माणसाला लागत असताना माणसाच्या अधोगतीचे मुख्य कारणच जातीय विषमता आहे म्हणजे जाती विषमता, अस्पृश्यता, अंधविश्वास, पाखंड या विरोधात येथे अनेक संतांनी आवाज उठवून साहित्याच्या माध्यमातून जनजागृती करून माणसाला एकतेचा संदेश देण्याचे काम करण्यात आले. संत आंदोलन किंवा संत परंपरा ही भक्ती व अध्यात्मावर अवलंबून नसुन ती समता, बंधुता, न्याय, शिक्षण, व मानवी स्वातंत्र्य यावर अवलंबून आहे. संत नामदेवांपासुन ते संत गाडगेबाबा पर्यंत अनेक संताचे आपल्याला दाखले देता येतात ज्यांनी समाजातील अनिष्ट, अमानवीय, चालीरीती रुढीपरंपरा या विरोधात आवाज उठवून समाजात समतेची पेरणी केली. परंतु हजारो वर्षापासून ज्यांचे पोट आणि अस्तित्व हे विषमता, द्वेष, पाखंड, अंधविश्वास यावर अवलंबून असलेल्या लोकांना संताची चळवळ व विचार पचणारे नव्हते म्हणून संतानाही या व्यवस्थेने त्रासुन सोडले. संत तुकाराम महाराज यांच्या गाथा बुडवून त्यांचा खुन करण्यात आला आणि त्यांच्या गाथेविरोधात समाजात संस्कार पेरण्याचे काम अविरत पणे सुरूच आहे. वर्णव्यवस्थेनुसार प्रत्येक वर्णाला आपापले काम वाटून दिले आहेत. अर्थात हि विषमतेची सुरवात आहे. एक वर्ण आपला वर्ण सोडून इतर वर्णात जाऊ शकत नाही. गेले तर ते धर्मपाप आहे अशी शिकवण धर्मग्रंथातुन आणि धर्माच्या ठेकेदाराकडून देण्यात आली. धर्म ग्रंथ व धर्माने मानसाच्या विकासाचे द्वार तर बंद केलेच होते परंतु सार्वजनिक संपत्ती चा उपभोग ही केवळ एकाच वर्णातील लोक घेतील, तो त्यांचाच अधिकार आहे, इतर वर्णातील लोकांना तो अधिकार राहणार नाही असे बिंबवले. स्वतः च स्वतःला श्रेष्ठ समजून इतरांना कनिष्ठ समजणारे निच व दृष्ट लोक येथे जन्माला आल्याने आणि डोक्यात विषमतेच्या जोरावर फक्त स्वतः चे पोट भरण्याचे माध्यम कायम रहावे म्हणून समतेला व समतेचे काम करणाऱ्यांना कधीच लोकां पर्यंत पोहचु दिले नाही. हिच व्यवस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मोडीत काढून ज्यांना धर्माने मंदिरात जाण्याचा, वेद वाचण्याचा सोड पण माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता अशा लोकांना वाचण्याचा, लिहण्याचा एवढेच नव्हे तर देशातील महत्वांच्या पदावर बसण्याचा अधिकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिला. ओबीसी मध्ये जेवढ्याही जाती आहेत यांच्या वर सर्वात मोठे उपकार आहेत ते फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे. ओबीसींनी प्रामाणिक पणाने जर संविधान आणि बाबासाहेब वाचले तर त्यांच्या लक्षात येईल ओबीचींचे खरे उद्धार कर्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत. आताचेच उदाहरण बघितले तर रामदास तडस खासदार असतांनाही मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यास मज्जाव केला. बरं हे रामदास तडस यांच्या बद्दल असे झाले का तर नाही. मागे संभाजीराजे भोसले यांना सुद्धां तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊ दिले नाही. माजी राष्ट्रपती कोविंद व त्यांच्या पत्नीला जगन्नाथ मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊ दिले नाही. आपण माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, संभाजीराजे भोसले आणि रामदास तडस यांचा विचार केला तर हे हिंदुच आहेत आणि मंदिरही हिंदुचीच आहेत. मग हिंदुंना हिंदुच्या मंदिरात जाण्यासाठी मज्जाव का? आणि हे तिघेही नामांकित व प्रतिष्ठित लोक आहेत. तरीही धर्मानुसार ते मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊ शकत नाहीत. एवढी मजबूत विषमता धर्माने वाढवली आहे. परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे रामनाथ कोंविद राष्ट्रपती, रामदास तडस खासदार होऊ शकतात मग धर्म आणि धर्मग्रंथ त्यांना मंदिरातही येऊ देत नाही? याचे काय कारण असु शकते. गळ्यात जानवे व सोवळे नसल्याचे कारण सांगून मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊ दिले नाही. तर तडस यांना जानवे व सोवळे देण्यासाठी किती खर्च आणि किती वेळ लागला असता? आणि जर तडस यांना जानवे दिले जात नसेल तर तडस यांचा धर्म कोणता? तडस ओबीसी आहेत आणि अश्या करोडो ओबीसी लोकांना शिक्षणाचा गंधही नव्हता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या साठी शिक्षणाची, नोकरी ची, व्यवसायाची सोय करून दिली व त्यांना शिक्षणा सोबतच नोकरी ही दिली ही गोष्ट ओबीसींनी लक्षात घ्यायला पाहिजे. मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याची आजही परवानगी नसताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला संसदे मध्ये जाण्याची, व केवळ जाण्याचीच नाही तर संसदेच्या सर्वोच्च खुर्चीवर बसण्याची संधी निर्माण करून दिली. अधिकारी होऊन संपूर्ण जिल्हा, तालुका सांभाळण्याची ताकद व क्षमता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण करून दिली. ओबीसींनी आपला इतिहास बघावा संविधाना अगोदर काय परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती आहे. फरक लक्षात येईल. परंतु मुळ मुद्दा हा आहे आजही बहुसंख्य ओबीसी हा ज्यांनी गुलाम बनवले, शिक्षण व समानता नाकारली त्याच लोकांचे वर्चस्व मान्य करताना दिसत आहे. आणि जे खरे उद्धारक आहेत त्यांच्या बद्दल ओबीसी अजूनही दुर आहेत. शिक्षण, निवडणूक यांच्या माध्यमातून संसदे पासून तर ग्रामपंचायत पर्यंत प्रत्येक ठिकाणी लोकप्रतीधी असो वा प्रशासकीय कर्मचारी अधिकारी हि सर्व देन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांगीण विकासाची द्वारे खुले करून सामाजिक विकास व सामाजिक न्याय देऊन प्रत्येकाला सन्मान निर्माण करून दिला. धर्म तर आजही खासदार असो वा राष्ट्रपती त्यांना दुय्यम व हिन वागणूक देत असेल तर अशा धर्माकडून काय शिकवण घ्यावी. आणि चुकीच्या वर्तनावर जर धर्मातील लोक बोलत नसतील तर आपण मानसिक गुलाम आहोत आणि धर्माने आपल्याला अंध केले हेच सिद्ध होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येकाला आपल्याला धर्माचे पालन करण्याचा अधिकार दिला पण धर्मांधता अधोगती कडे घेऊन जाते. हिंदु म्हणून रस्त्यावर उतरणाऱ्या संघटना खासदार रामदास तडस, राष्ट्रपती रामनाथ कोंविद, यांच्या सन्मानासाठी आणि छत्रपती संभाजी महारांजाबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर बद्दल स्वतःला हिंदुत्ववादी समजणाऱ्या संघटना समोर येऊन न्याय मागत नसतील तर हिंदुत्ववादी संघटना चालक यांचे हिंदुत्व व वर उल्लेख केलेल्या लोकांचे हिंदुत्व वेगळे आहे का? रंगावरून, गोमांस संशयावरून, आरोपीची जात बघुन जागृत होणाऱ्या हिंदुत्ववादी संघटना हिंदुच्या न्यायासाठी रस्त्यावर का उतरत नसतील? रामदास तडस यांना गाभाऱ्यात जाऊ दिले नाही तर आता हिंदु धर्म धोक्यात नाही का? हिंदु व्यक्तीलाच खासदार असुन मंदिरात आजही प्रवेश नाकारला जात असेल तर सर्वसामान्य मानसांची काय परिस्थिती असेल? आजही मंदिर प्रवेश नाकारण्याच्या घटना घडत असतील तर संविधान लागु होण्या अगोदर काय परिस्थिती असेल याचा प्रामाणिक अभ्यास व चिंतन होणार आहे का? ओबीसींनी आजही विचार करून जागृत होणे गरजेचे आहे. संविधानाने ओबीसी साठी शिक्षण, नोकरी, राजकारण व इतरही हक्क अधिकारा द्वारे देशाच्या शासन प्रशासनात सहभागी होण्याचे, शिक्षणाच्या माध्यमातून जागृत होण्याचे दरवाजे खुले केले. जे धर्मग्रंथ व धर्माच्या ठेकेदारांनी कायमचे बंद केले होते. आजही पुन्हा धर्माचे ठेकेदार आणि विषमतावादी धुर्त व ज्यांचे विषमतेवर पोट भरले जाते असे लोक ओबीसींना धर्माच्या नावावर भावनिक बनवत आहेत आणि हळूहळू शिक्षण, नोकरी व रोजगारापासुन दुर नेत आहेत हि गोष्ट समजून घेतली तर येणाऱ्या पिढ्या जागृत होतील नाहीतर मानसिक गुलामी पुन्हा येईल परंतु धर्मांच्या आडून याची लवकर जाणीव होणार नाही. म्हणून ओबीसींनी आपल्या विकासाचे द्वार उघडणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार स्विकारून स्वतः च्या पिढ्यांचा उद्धार होईल नाहीतर आजही द्वार ओबीसींसाठी बंद आहेतच याची जाणीव प्रत्येकाला असेल तरच ओबीसी आपले अस्तित्व व स्वाभिमान टिकवून ठेवेले. थोडक्यात सांगायचे तर ओबीसींचे सर्व दरवाजे बाबासाहेब आंबेडकर यांनी उघडले. आणि हेच उपकार फक्त ओबीसींनीच नाही तर देशातील प्रत्येक व्यक्तीने विसरू नये. शोकांतिका अशी आहे की ज्यांची ज्यांना संसदेत जाण्याचा, जिल्हाधिकारी होण्याची दार खुले करणाऱ्या महापुरुषांच्या उपकाराची जाणीव ठेवली तरच येणारी पिढी स्वाभीमानी आणि विकसित होईल नाही तर गुलामी निश्चितच. सलामी फक्त बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारच मिळवून देऊ शकतात.
-विनोद पंजाबराव सदावर्ते
समाज एकता अभियान
रा. आरेगांव ता. मेहकर