शास्त्रज्ञ डॉ शंकर आबाजी भिसे ‘भारतरत्न’च्या तोडीचे
स्वातंत्र्यपूर्व काळातील थोर भारतीय संशोधक डॉ शंकर आबाजी भिसे यांची आज पुण्यतिथी. त्यांचा जन्म २९ एप्रिल १८६७ रोजी मुंबईत झाला. भारताचे एडिसन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ शंकर आबाजी भिसे या महान शास्त्रज्ञाचा जन्म मुंबईमध्ये एका मॅजिस्ट्रेटच्या घरी झाला. दोनशेच्यावर निरनिराळे शोध लावणारे आणि चाळीसहून अधिक शोधांचे एकस्व संपादन करणाऱ्या डॉ शंकर आबाजी भिसे यांची आज पुण्यतिथी असल्याने त्यांचे स्मरण करणे हे आपले कर्तव्यच आहे तरीही त्यांचा विसर पडणाऱ्यांचीच संख्या यंदाही अधिक असेल. ज्या काळात भारतीय नागरिकांना कमी लेखले जात होते त्याकाळात डॉ भिसे यांनी संशोधनक्षेत्रात अजोड कार्य केले. लहानपणी एकदा भिसे साखर आणायला वाण्याकडे गेले. त्यावेळी वाण्यानी लबाडी करून कमी वजनाची साखर दिल्याचं त्यांच्या लक्षात आलं. याबाबत त्यांनी व्यापाऱ्याला विचारलं असता ” माझ्या काट्यावर विश्वास नसेल तर आपोआप वजन करणारं यंत्र शोधून काढ.” असं वाण्याने त्यांना खोचकपणे म्हटलं. त्यावेळी एक दिवस तुला असे यंत्र देईन अस छोटा शंकर त्यांना आत्मविश्वासाने म्हणाला. लहानपणापासून संशोधनाची आवड असणाऱ्या डॉ भिसे यांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी दगडी कोळशापासून गॅस शुद्ध करण्याचे यंत्र बनवले. १८९७ मध्ये इन्व्हेंटर रिव्हीव अँड सायंटिफिक रेकॉर्ड या मासिकाने स्वयंमापन यंत्र करण्याची एक स्पर्धा जाहीर केली. स्वयंमापन यंत्र म्हणजे साखर, पीठ इत्यादी वस्तूंचे गिर्हाईकाला हवं तेवढं वजन करुन देणारं यंत्र. डॉ भिसे यांनी अशा यंत्राचा आराखडा तयार करून पाठवला. त्यांनी तयार केलेल्या वजन मापन यंत्राच्या आराखड्याला इंग्लंडमध्ये पहिले बक्षीस मिळाले. या स्पर्धेत युरोप आणि अमेरिकेतल्या नामांकित यंत्र शास्त्रज्ञांनी भाग घेतला होता हे विशेष. इंग्लंडमध्ये गेल्यावर त्यांनी छपाईच्या क्षेत्रात अनेक शोध लावले. १९०० साली डॉ भिसे यांचं लक्ष मुद्रण व्यवसायातील यंत्र सामग्रीकडे लागलं. त्या काळी प्रचलित असलेल्या लायनो, मोनो इत्यादी यंत्राची रचना आणि कालमर्यादा यांचा अभ्यास करुन त्यांनी भिसो टाईप या यंत्राचा शोध लावला व त्याचं प्रथम इंग्लंडमध्ये आणि नंतर अमेरिक, जर्मनी, फ्रांस या देशांमध्ये पेटंट घेतले. या यंत्राच्या उत्पादनासाठी सर रतनजी टाटा यांचे सहकार्य मिळवून द टाटा भिसे इन्व्हेशन ही कंपनी १९१० मध्ये लंडन येथे स्थापन केली. पण १९१५ मध्ये ती बंद पडली. त्याच सुमारास दर मिनिटाला साधारण बाराशे अक्षर छापणारं गुणीत मातृका हे यंत्र तयार केलं आणि १९१६ मध्ये विक्रीला आणलं. १९१६ साली भिसे अमेरिकेला गेले तिथे त्यांनी युनिव्हर्सल टाईप क्लस्टर हे यंत्र शोधून काढले आणि अमेरिकेत त्याचं पेटंट घेतले. याशिवाय मुद्रण व्यवसायातली आणखी अनेक यंत्रे त्यांनी तयार केली. १९१० साली साली डॉ भिसे आजारी असताना त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वापरण्यात आलेलं एक भारतीय औषध फार गुणकारी ठरलं. या औषधाचं रासायनिक पृथःकरण त्यांनी करवून घेतलं आणि त्याच्या गुणकारीपणा आयोडीनामुळे आहे जाणलं. १९१४ साली डॉ शंकर आबाजी भिसे यांनी स्वतःच एक नवीन औषध तयार केले आणि त्या औषधाला बेसलिन हे नाव दिले. हे औषध बाह्येपचारासाठी उपयुक्त ठरले. पहिल्या महायुद्धात या औषधाचा अमेरिकेने मोठ्या प्रमाणात वापर केला. या औषधामुळे पहिल्या महायुद्धात अनेक सैनिकांचे प्राण वाचले. या औषधावर आणखी संशोधन करून आयोडीन घटक असलेलं पण पोटात घेता येईल असं एक औषध नंतर डॉ भिसेंनी तयार केलं या औषधाला ऑटोमेडीयन असं नाव दिलं. हे औषध बऱ्याच रोगांवर उपयुक्त ठरले. पुढे त्यांनी कपडे धुण्यासाठी एक नवे संयुग तयार केले. डॉ भिसे यांनी विद्युत शास्त्रातही अनेक शोध लावले. डॉ भिसे यांच्या साठाव्या वाढदिवशी इंग्लंडमध्ये त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. या सुमारास त्यांची महान शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांच्याशी भेट झाली. एडिसन यांनीही त्यांच्या संशोधन कार्याचा गौरव केला. डॉ भिसे इंग्लंडमध्ये असताना इंग्लंडचे आफ्रिकेशी युद्ध सुरू झाले. स्वयंचलित तोफा काढण्याची विनंती तेथील कारखानदारांनी डॉ भिसे यांना केली. त्यासाठी डॉ भिसे यांना त्यांनी खूप पैसे देऊ केले, पण आपले संशोधन हे विश्वाच्या कल्याणासाठी असून आपल्या संशोधनातून विश्वाचा संहार होऊ नये अशी त्यांची मानवतावादी भूमिका होती. म्हणूनच त्यांनी ही मागणी नम्रतापूर्वक नाकारली. डॉ भिसे यांनी सुमारे २०० शोध लावले. त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे ७ एप्रिल १९३५ रोजी या महान शास्त्रज्ञाचे निधन झाले. संशोधन क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. शासनाने त्यांच्या या महान संशोधकाच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करावा.
-श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे