Sunday, October 26, 2025
Homeअग्रलेखभिमजयंती.... भिमाचे विचार किती? 

भिमजयंती…. भिमाचे विचार किती? 

भिमजयंती…. भिमाचे विचार किती? 
जन सामान्माचा उद्धार
फक्त भिमाने येथे केला रे
महिलांचा करून सन्मान
हक्क अधिकार दिला रे
मिठालाही जानणारा समाज
भिमाला बेईमान का झाला रे?
भिमजयंती आली की हंगामी आंबेडकरवादी जागृत होतात आणि भिमजयंती धुमधडाक्यात साजरी करण्याचे नियोजन करतात. जयंती धुमधडाक्यात साजरी करायची म्हणजे काय तर समाजातुन वर्गणीच्या नावाने पैसा गोळा करायचा, मोठ मोठे बॅनर लावायचे, मिरवणुकीत डिजे लावायचा, मद्यपान करून मनसोक्त नाचायचे. मिरवणुकीत घसा कोरडा होईपर्यत जयघोष करायचा, मानुस माणसा पासून दुर जाईल असे नारे द्यायचे हिच धुमधडाक्यात जयंती. काही काही ठिकाणी तर वैचारिक जयंतीच्या नावाखाली गाण्याचा, भाषणाचा कार्यक्रम ठेवायचा, ज्यातून केवळ मनोरंजन आणि चुकीचे बाबासाहेब सांगुन बाबासाहेब आंबेडकर यांना संकुचित करून पैशाचे मोठे पाकीट घेऊन स्वतः चा धंदा मात्र मोठा करायचा याला म्हणायचे धुमधडाक्यात जयंती साजरी करणे. मुळात आपण महापुरुषांच्या जयंती साजरी का करतो? जयंती साजरी करण्याचा उद्देश काय आहे हा उद्देशच जयंती मधून निघून जाऊन निव्वळ मनोरंजन व नाचगाणी याने जागा घेतली आहे. अनेक गाण्या मधुन, अनेक पाकिट घेऊन बोलणाऱ्या वक्त्याच्या भाषणामधुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची व विचाराची चुकिची आणि संकुचित मांडणी केली जाते.  याच कारणामुळे देशाला एकसंघ ठेवणारे, अडाण्याला शिक्षीत करणारे, मुक्याला बोलायला लावणारे, लंगड्याना चालायला लावणारे, सर्वांना समान हक्क अधिकार बहाल करणारे, ज्यांच्या अनेक पिढ्या गुलामीत आणि लाचारीत गेल्या अशा लोकांना सत्तेत बसवणारे, जाती पंथावरून हिनवल्या जाणाऱ्या सर्व जातींतील लोकांना अधिकारी करणारे, माणसामध्ये स्वाभिमान, सन्मान आणि वैचारिक उर्जा भरणारे, महिलांना सन्मान, सलाम, व पुरुषांप्रमाणे स्थान देऊन त्यांचे रक्षण करणारे, कामगारांचे उद्धारक, शेतकऱ्यांचे कैवारी, विद्यार्थांचे मार्गदाते, आणि महिलांचे रक्षणकर्ते, मी प्रथम आणि अंतिमतः भारतीय असे ठणकावून सांगणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर आजही घराघरात मनामनात पोहोचले नाही याचे एकमेव कारण गायक, कवी, वक्ते, लेखक यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने दुकानदारी सुरू केली आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मर्यादित करून सांगितले. जयंती साजरी करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर, विचारावर जागृती होणे आवश्यक आहेच परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करताना किमान जयंती साजरा करणारे मंडळ, गाणारे, बोलणारे, लिहणारे लोक तरी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने चालतात का यावर सुद्धा चिंतन होणे आवश्यक आहे. आज बरेच लोक बाबासाहेब आंबेडकर यांची मांडणी करताना चुकिची, द्वेषाची व एकांगी करतात. देशाचे व देशातील जनतेने उद्धारक असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जात किंवा धम्म बघुनच जर होत असेल तर याची नैतिक जबाबदारी कोणी घ्यायची? बाबासाहेब आंबेडकर यांची चुकिची मांडणी करायची, त्यांचा संबध एका जातीशी आणि धर्माशी जोडायचा, बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन द्वेषात्मक नारे द्यायचे, दारु प्यायची, जातीचा गर्व बाळगायचा आणि मग म्हणायचे बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्वांनी साजरी केली पाहिजे. परंतु येथे स्वतः च बरोबर न वागता इतरांकडून अपेक्षा केली जाते. भिमजयंती साजरी करताना आनंद नक्कीच असायला पाहिजे. परंतु त्याचा अतिरेक होऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेच विचार पायदळी तुडविले जातील तर आपणच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे मारेकरी आहोत हे मान्य करावे लागेल. आज मोठमोठ्या बॅनर वर बेरोजगार, बेवड्या लोकांचे फोटो घेतले जातात. कशासाठी?  फक्त नाव आणि मोठेपणा. पण त्याच बॅनर वर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार लिहून जनजागृती करणार नाहीत. लाखोंरुपयांचा डिजे लाऊन तरुण तरुणी नाचवतील परंतु डिजे चा खर्च कमी करून एखाद्या गरिब होतकरू विद्यार्थांचा खर्च उचलणार नाहीत. एक वही पेन असे कार्यक्रम सुरु झाले. लहान वही पेन वाटून मोठमोठे फोटो काढणे केवळ देखावा झालेला आहे. जयंती साजरी होताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कुठे दिसत नाहीत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश आहे. शिका संघटीत व्हा संघर्ष करा. आम्ही शिकलो, संघटीत न होता स्वतः च्याच संघटना काढल्या, आणि स्वतः संघटनेच्या माध्यमातून स्वतः चे पोट भरण्यासाठी लाचारी, बेईमानी करून संघर्ष सुरू आहे.   आणि म्हणूनच डॉ बाबासाहेब  आंबेडकर यांची चळवळ, विचार व आचार आज मर्यादित होत आहे. बाबासाहेब आंबेडकर बौद्धांची खाजगी संपत्ती असल्या सारखे लोक वागत आहेत परंतु स्वतःला बौद्ध समजणारे लोक भिमाच्या मताचे नाहीत ही शोकांतिका आहे. म्हणून वामनदादा म्हणतात.
भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते
वाणीत भीम आहे, करणीत भीम असता
वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते.
तत्वाची जाण असती, बिनडोक लोक नसते
सारे चलन तयांचे ते रोखठोक असते.
सदभाव एकतेचे जर अंतरात असते
चुकले कुणीही नसते सारेच एक असते
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बेकी करून स्वतः चा स्वार्थ साधणारे धुर्त लोक तयार झाल्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी एकतेचा संदेश दिला हे बोलण्याचा तरी अधिकार आहे का? तत्व विसरल्याने सर्वजन बिनडोक सारखे  वागून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अवमान करत आहेत. प्रत्येकाला स्वाभिमान देणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेच नाव घेऊन आज अनेक जन लाचारी करत आहेत आणि लाचार लोक जयंती मध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत तेथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची खरचं पेरणी होईल का? डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी खंत व्यक्त केली होती ती म्हणजे मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी असे का म्हणले होते यावर ही विचार विनीमय होणे आवश्यक आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः च्या कमाईतून परदेशात काही लोकांना शिक्षणासाठी पाठवले होते. शिक्षण पुर्ण झाल्यावर त्या लोकांनी समाजाकडे वळुनच बघितले नाही. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते शिक्षण फक्त पोटभरण्याचे साधन नाही तर सामाजिक विकासाचे माध्यम आहे. परंतु त्याकाळी शिकलेल्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित काम केले नाही. तर आजही शिकलेले व मोठ्या पगारावाले लोक खरचं गरजू लोकांच्या शिक्षणावर, आरोग्यावर, रोजगारावर खर्च करतात का? एकटे बाबासाहेब शिकले तर त्यांनी पंचवीस पेक्षा जास्त लोकांना परदेशात स्व खर्चाने पाठवले. आज अनेक लोक शिकले त्यांनी किती विद्यार्थ्यांना शिकवले? डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्म स्विकारला, देवांना नाकारून विज्ञान दिले अशी मांडणी करून बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हिंदु व देव देवता विरोधी करून हिंदु धर्मातील लोकांपासून अलगद बाबासाहेब आंबेडकर यांना दुर करण्याचा प्रयत्न दररोज जयभीम बोलणारे लोकच करत आहेत. शिकलेले लोक आजही स्वतः चे घर, स्वतः चे मुलं मुलांचे भविष्य यातच मग्न आहेत. यातील बरेच लोक बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर मोठ मोठे भाषण देतात पण बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे आचरण करून एखाद्या ला रोजगार, एखाद्या ला शिक्षण उपलब्ध करून देत नाही ही शोकांतिका आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्याचा जास्तीत जास्त फायदा हिंदु धर्मातील लोकांनाच झाला, शेतकरी, कामगार, महिला यांच्या उद्धाराचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले संख्येने जास्त तेच आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आरक्षणाचे 99% लाभार्थी हे हिंदुच आहेत. हिंदू कोड बिलामधुन हिंदु महिलांचाच उद्धार झाला ह्या गोष्टी पाहिजे त्या तिव्रतेने कोणी मांडत नाही. आमचा बाप, आमचे संविधान म्हणु म्हणु खरे बाबासाहेब व खरे संविधान लोकांपर्यंत पोहचलेच नाही. खऱ्या अर्थाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक जयंती साजरी झाली असती तर कमीत कमी बौद्धांमध्ये एकी निर्माण झाली असती, याच एकितुन बौद्धांकडे स्वत:चे व्यवसाय जसे बँक, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल असते. त्यातून समाजाची सेवा व सामाजिक विकासही झाला असता. परंतु आज एकही मोठी बँक, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल सोडा पण वृत्तपत्र ही नाही. काही लोक वृत्तपत्र काढतात परंतु शिकलेले लोक ते वृत्तपत्र वाचत नाहीत आणि ते चालविण्यासाठी अर्थ सहाय्य पण करत नाहीत हि शोकांतिका आहे. जगाने मान्य केले की ज्ञानाचे प्रतिक हे डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्याच बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपल्याच देशात अज्ञान आहे. प्रत्येक जन सोईनुसार बाबासाहेब आंबेडकर सांगत आहेत परंतु खरे बाबासाहेब अजूनही लोकांना समजले नाही. दरवर्षी जल्लोषात जयंती साजरी होऊनही जर बाबासाहेब आंबेडकर घराघरात पोहचले नसतील तर अशी जयंती साजरी करून आपण काय साध्य करत आहोत? पगार घेणारे लोक हजार पाचशे रुपये नाचगाण्याबठी देऊन सामाजिक कार्य पुर्ण केल्याचा आव अंगात आणतात पण बाबासाहेब म्हणाले होते उत्पनातील विसावा भाग समाजासाठी द्या. नाचगाणी म्हणजे समाज का? आणि खरचं विसावा भाग नियमित देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे इमानदार अनुयायी किती? डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गाने कोणताही व्यक्ती, समाज जर चालला तर त्यांचे कल्याणच होणार परंतु बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध म्हणून बंधिस्त करणे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे पालन न करणे हाच मोठा द्रोह आहे. समाजाच्या हितासाठी, माना सन्मानासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः च्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केले आहे सर्वांना मानसन्मान मिळवून दिला. म्हणून दादा म्हणतात….
काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने
लोक मुजरे मला करती भिमाच्या प्रतापाने
काल पर्यंत जो जो समाज या व्यवस्थेला मुजरे करत होता. अर्थात गुलामाचे जिवन जगत होते त्या समाजाला, खितपत पडलेल्या स्रियांना सलामी मिळवून देण्याचे काम केले. परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकरां नंतर चळवळ व विचाराचे आपण काय केले? डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार चळवळ केवळ भाषणात आहे, भाषण देऊन राशन मिळवणारे लोक बाबासाहेब सांगायचे पाच आकडी सहा आकडी रक्कम घेतात त्यातही चुकीचे बाबासाहेब सांगतात, गायक लोकही कमी नाहीत. रक्तात भिम शोधायला लावतात, लोकांना भावनिक करतात, लोक भावनिक झाले म्हणजे दुकानदारी चालते. रक्तात भिम शोधता शोधता विचारातील भिम गायब होत आहे याचे भानच राहिले नाही. विचारातील भिम गायब होणे हे अधोगती, गुलामगिरी व लाचारीचे लक्षण आहे. म्हणून जयंती साजरी करत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे विचार पेरणे,  बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे आचाराचे किती लोक आहेत? ते निर्माण कसे करायचे? समाजातील पैसा खर्च कोठे करायचा या सर्व गोष्टी वर विचारमंथन होऊन जागृतीचा व परिवर्तनाचा जल्लोष सर्वसामान्य मानसापर्यंत पोहचला तरच भिमजयंती धूमधडाक्यात साजरी झाल्याचे सार्थक होईल.
-विनोद पंजाबराव सदावर्ते
समाज एकता अभियान
रा. आरेगांव ता. मेहकर
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments