८ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस
प्रति माननीय संपादकजी
विषय:- अत्याधुनिक युगात १०० टक्के साक्षर होणे गरजेचे.
१९६५ मध्ये ८ ते १९ सप्टेंबर दरम्यान इराणची राजधानी तेहरान येथे जगभरातील शिक्षणमंत्र्यांची एक बैठक झाली. यानंतर १९६६ साली संयुक्त राष्ट्रसंघाने शिक्षणप्रणालीमध्ये जागरूकता वाढावी याउद्देशाने ८ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासुन जगभरात ८ सप्टेंबरला दरवर्षी साक्षरता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.म्हणजेच देशाची प्रगती असो वा स्वतःची प्रगती असो शिक्षण अत्यंत महत्त्वाचे असते.हाच उद्देश साक्षरतेचा आहे.कारण यातुनच आयुष्याची जडणघडण निर्माण होते व मन्युष्य घडतो.आज अनेक देश प्रगतीपथावर आहेत.परंतु आफ्रिका आणि आशिया खंडात साक्षरतेचे प्रमाण कमी दिसून येते.याचे मुख्य कारण म्हणजे अशिक्षितपणा, बेरोजगारी,भुकमरी, कुपोषण व जंगली जीवन आहे.आजही भारतसुध्दा पुर्णपणे साक्षर नाही.याकरीता सरकारला मोठे अभियान चालविण्याची गरज आहे.भारत सध्याच्या परिस्थितीत फक्त ६० टक्के साक्षर आहे.देशात साक्षरतेच्या अभावामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यां होत आहे.त्या थांबविण्याचा संकल्प ८ सप्टेंबरला घेऊन साक्षरता अभियान युध्दपातळीवर व्हायला पाहिजे.कारण बदलत्या काळानुसार १०० टक्के साक्षर होणे गरजेचे आहे.भारतातील केरळ हे असे एकमेव राज्य आहे की ते १०० टक्के साक्षर आहे.आजच्या परिस्थितीत ज्या देशात साक्षरतेचे प्रमाण कमी आहे तो देश मागासलेल्या देशाच्या रांगेत येतो. भारतातील आदीवासी भाग व अती दुर्गम भाग अजून पर्यंत साक्षर नाहीत.त्यामुळे त्यांना अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो.साक्षरतेच्या अभावामुळे देशातील अनेक दुर्गम भागातील राज्यात नक्षलवादाचा किंवा गुन्हेगारांचा जन्म होतो.अती दुर्गम भागात पोषक आहाराची व योग्य शिक्षणाची गरज आहे अन्यथा येथुनच कुपोषण,भुकमरी, वाममार्ग व आत्महत्येचा उदय होत असतो.भारतातील वाढती लोकसंख्या ही साक्षरतेच्या अभावामुळेच निर्माण झालेली मोठी समस्या आहे.भारतातील वाढत्या लोकसंख्येमुळे धर्मा-धर्मात कटुता निर्माण होते आणि धर्माच्या नावावर लोकसंख्या वाढवीण्याची शर्यत लागते. यामुळेच भारताला लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. भारतातील वाढती लोकसंख्या नियंत्रीत ठेवण्यासाठी भारताने साक्षरता अभियान युध्दपातळीवर राबवायला हवे.जगातील अनेक देश प्रगतीपथावर आहेत.आज प्रत्येक देशाजवळ मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि अत्याधुनिक शस्त्रसामग्रीचा साठा आहे.परंतु जर तो देश साक्षर नसेल तर काय फायदा असे देश मागासल्यामध्ये गणल्या जातात.आज पाकिस्तान फक्त २० टक्के साक्षर आहे.त्यामुळे तो गेल्या ७८ वर्षाच्या काळात तो कवडीचीही प्रगती करू शकला नाही.पाकिस्तानने फक्त आतंकवाद्यांना खतपाणी घालण्याचे काम केले व आताही करीत आहे व याचा परिणाम आज संपूर्ण पाकिस्तान रक्ताच्या लाथोळ्यात लथफतलेला दिसून येतो.त्यामुळेच आज पाकिस्तानाच्या हातात भिकेचे ढोबर दिसून येते व आजच्या परिस्थितीत पाकिस्तान जगातील आतंकवाद्यांचे माहेरघर बनले आहे. जगातील प्रत्येक देशांनी ८ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे औचित्य साधून प्रत्येक देशांनी साक्षरता अभियान युध्दपातळीवर चालवायला पाहिजे. यामुळे देश प्रगतीपथावर येईल.आजच्या यांत्रिकी युगात युवावर्ग मोबाईलमध्ये गर्क असतो.त्यामुळे नवीन नवीन अनेक व्याधी निर्माण होवू शकते याला नाकारता येत नाही.याकरिता साक्षरतेच्या माध्यमातून जनजागृती करून मोबाईल पासून होणाऱ्या नुकसानाबद्दल सूध्दा जागृती करणे आज गरजेचे आहे.आज स्वीडनमध्ये दोन वर्षांखालील मुलांना मोबाइल, टीव्ही पाहण्यास बंदी घालण्यात आली आहे.देशाच्या सार्वजनिक आरोग्य संस्थेच्या मते स्क्रीनचा वापर शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करत असल्याने लहान मुलांना डिजिटल मीडिया आणि टेलिव्हिजनपासुन पूर्णपणे दूर ठेवले पाहिजे.हा संपूर्ण परीणाम साक्षरतेच्या अभावामुळे निर्माण झाल्याचे दिसून येते.साक्षरता म्हणजे फक्त शिक्षण नसुन आपुलकी,खान-पाण, रहाणीमान,देशाचा विकास, पारिवारिक सुख-दु:ख, सुविधा, परिपक्वता,संस्कृती, आरोग्याची काळजी, सोशल मिडियापासुन लहान मुलांवर होणारे दुष्परिणाम ह्या संपूर्णबाबी साक्षरतेमध्ये मोडत असतात.आज संपूर्ण जग बारूदच्या ढीगाऱ्यावर बसलेले आहे.त्यामुळे पृथ्वी नष्ट व्हायला काहीच वेळ लागणार नाही. आज जगात महाप्रलय, भुकंप, सुनामी, अतिउष्णता, अतिथंडी, ज्वालामुखीचा उद्रेक ह्या संपूर्ण विनाशकारी घटना मानवाने स्वतःहून ओढवल्या आहेत. जगात सध्याच्या परिस्थितीत जंगल तोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे यामुळे पृथ्वीतलावरील सर्वांचा जीव धोकादायक स्थितीमध्ये आल्याचे दिसून येते. ह्या सुध्दा साक्षरतेच्या अभावामुळेच निर्माण झालेल्या समस्या आहेत. आंतराष्ट्रीय साक्षरता दिनाचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात साक्षरता अभियान छेडुन मानवजाती, जिवजंतु, पर्यावरण व निसर्ग यांना वाचविले पाहिजे.कारण मानव हा बुध्दीजीवी प्राणी आहे त्यामुळे तो स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही स्तरावर जात असतो अशा परिस्थितीत तो मागचा-पुढचा कुठलाही विचार करीत नाही व याचा दुष्परिणाम संपूर्ण मानवजातीला व जीवसृष्टीला भोगावा लागतो. ह्या संपूर्ण बाबी साक्षरतेच्या अभावामुळे निर्माण झाल्याचे दिसून येतो.त्यामुळे साक्षरतेमध्ये सर्वच स्तरातून विचार व्हायला हवा.ॲम्याझॉनसारखे जंगल जळने,वनवे लागले, महाप्रलय येणे हे सर्व साक्षरतेच्या अभावामुळे निर्माण झालेली परिस्थिती आहे असे मला वाटते. निसर्गाचे वाटोळे मानवाने केले, जंगल संपदा मानवाने नष्ट केली, नवीन-नवीन समस्या मानवाने निर्माण केल्या यामुळेच आज पृथ्वी भयभीत आहे.मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी पृथ्वीच्या पोटातील संपूर्ण पाणी निचोडुन टाकले यामुळेच आज अनेक देश पीण्याच्या पाण्यासाठी रेडझोनमध्ये आल्याचे दिसून येते.याला साक्षरतेच्या माध्यमातून जनजागृती करून वाचविले पाहिजे.याकरिता जगातील प्रत्येक देशांना युध्दपातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे.आज प्रत्येक देश युद्धासाठी सज्ज आहे त्यापध्दतीने प्रत्येक देशांनी आपली तयारी केली आहे.म्हणजे जग आज तिसऱ्या महायुध्दाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे.याला साक्षरता अभियानाच्या माध्यमातून थांबविले पाहिजे. जगातील प्रत्येक देशांनी प्रगती अवश्य करावी.परंतु मानवजातीच्या कल्याणासाठी व जे निसर्गाच्या सानिध्यात रहातात (पशुपक्षी,वण्यप्राणी)त्यांच्यावर कोणताही प्रकारचा अन्याय होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. यातच आपल्या खरा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दिसून येईल. चारित्र्य बनविण्यासाठी, चांगलेव्यक्तीत्व निर्माण करण्यासाठी जो कोणी प्रयत्न करेल तोच खरा साक्षरतेचा भागीदार आहे.८ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवसाचे औचित्य साधून जगभरातील प्रत्येक देशांनी साक्षरता अभियानासोबत बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी वृक्षलागवड अभियान युध्दपातळीवर चालवायला पाहिजे. यामुळे निसर्ग प्रफुल्लित रहाण्यास मोठी मदत होईल.
–रमेश कृष्णराव लांजेवार
