Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादएसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १३: एसटीच्या ८५ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे जाहीर केला. तसेच, वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा ६५ कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रीम म्हणून १२ हजार ५०० रुपये देण्याचाही निर्णय घेण्यात आला.

एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली, त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. बैठकीस परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहसचिव राजेंद्र होळकर तसेच विविध संघटनांचे  प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यात अतिवृष्टीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील गोड झाली पाहिजे म्हणून शासनाने हा निर्णय घेतला आहे. एसटीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे आहे. एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी खासगी शासकीय सहभागी तत्वावर एसटी महामंडळाच्या जागांचा विकास करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये देण्यासाठी शासनाने ५१ कोटी रुपये अनुदान देण्याचे मान्य केले आहे. तसेच २०२०-२४ दरम्यानच्या वेतन फरकाची वाढीतील रक्कम कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनासोबत देण्यात येणार असून यासाठी शासनाने ६५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याबरोबरच जे पात्र कर्मचारी सण अग्रीम घेण्यास इच्छुक आहेत त्यांना देखील पूर्वीप्रमाणे १२ हजार ५०० रुपये देण्यात येणार आहेत त्यासाठी शासनाकडे ५४ कोटी रुपयांची मागणी एसटी महामंडळाने केली आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments