वीजचोरी करणाऱ्या 35 जणांवर गुन्हा दाखल
मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांविरोधात महावितरणची मोहीम
छत्रपती संभाजीनगर : मीटरमध्ये फेरफार करून बेकायदेशीरपणे वीज वापरणाऱ्या शहर व परिसरातील 35 जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करणाऱ्या 2 जणांचा समावेश आहे. महावितरणच्या धडक कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.
महावितरणच्या तपासणी मोहिमेत नारेगावातील 32 ग्राहक मीटरमध्ये फेरफार करून अनधिकृतपणे वीज वापरत असल्याचे आढळले. रवी किसन चव्हाण, कचरू गंगाधर वाघ, अन्सारी इजाजशहरुल हसीम मिया, ताहेर भिक्कन पटेल, शांतादेवी हरिश्चंद्र मौर्या, सायरा बेगम शेख अहेमद, महेबूब खान सरदार खान, शोभा अशोक निकम, शेख हकीम शेख वाहेद, अब्दुल माजीदजहूर अहेमद, दीपक भाऊराव लोखंडे, शेख हकीम शेख अब्दुल, हकीमाबी रशीद पठाण, झाकेराबी शेख आरेफ, शेख रौफ शेख दौड, कुसुम महेंद्र चौधरी, माजीद अब्दुल गणी अब्दुल, सय्यद बशीर सय्यद वजीर, गणी गफ्फुर कुरेशी, तारेक अब्दुल रौफ अंबारी, सय्यद बिसमिल्लाबी सय्यद सरवार, इस्माइलखा इब्राहिमखा पठाण, किशोर किसन रसोदा, विलास प्रल्हाद चव्हाण, शोभा बद्रीनाथ चव्हाण, बाबूलाल मोहनसिंग बिजारणे, जिंजर संजय रामचंद्र, हिरचंद रतनसिंग माचरेकर, त्रिंबक युवराज जावळे, प्रमिला रामकृष्ण, स्वप्निल किसन निम्कर्डे व पठाण जुनेद खान साबेर खान हे वीजचोरी करताना आढळले. त्यांनी महावितरणचे 6 लाख 49 हजार 960 रुपयांचे आर्थिक नुकसान केले. वीजचोरीची बिले व 64 हजार रुपयांचे तडजोड शुल्क भरण्यास त्यांनी टाळाटाळ केली. जयभवानीनगर येथील अंजनाबाई विलास डेंगळे हिने 15 हजार 941 रुपयांची वीजचोरी केली. वीजचोरीचे बिल व 2 हजार रुपयांचे तडजोड शुल्क भरण्यास ग्राहकाने टाळाटाळ केली. विमानतळ शाखेचे सहायक अभियंता प्रदीप मिसाळ यांच्या फिर्यादीवरून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कुंभेफळमध्ये दोन वीजग्राहक अत्याधुनिक स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करताना आढळून आले. संतोष रामदास घुसिंगे याने 9 हजार 827 रुपयांचे वीजचोरीचे बिल व 6 हजार रुपयांचे तडजोड शुल्क भरले नाही. जयश्री अनिल त्रीगोटे हिने 16 हजार 647 रुपयांचे वीजचोरीचे बिल व 4 हजार रुपयांचे तडजोड शुल्क भरले नाही. शेंद्रा एमआयडीसी शाखेचे सहायक अभियंता संभाजी अथरगण यांच्या फिर्यादीवरून चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वीजचोरी हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून या गुन्ह्यात तीन वर्षे कारावास किंवा दंड अथवा या दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. त्यामुळे कुणीही मीटरमध्ये फेरफार करून वीजबिल कमी करण्याचे आमिष दाखवत असेल तर त्याला बळी न पडता वीजग्राहकांनी त्याची तातडीने महावितरणला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
