जिल्ह्याचा वार्षिक पतआराखडा ३३ हजार ५०० कोटी रुपयांचा
पिककर्ज पुरवठ्यासाठी कालबद्ध
कार्यक्रम राबवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर/ जिल्ह्याचा सन २०२५-२६ करीता ३३ हजार ५०० कोटी रुपयांचा वार्षिक पतआराखडा तयार करण्यात आला आहे. आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते या पतआराखड्याचे विमोचन करण्यात आले. शेतकऱ्यांना वेळेत पिक कर्ज पुरवठा होण्यासाठी बॅंकांनी कालबद्ध पद्धतीने कार्यक्रम राबवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व बॅंकांना दिले.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा बॅंकर्स समितीच्या तिमाही बैठकीत हा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी अशोक शिरसे, भारतीय रिझर्व बॅंकेचे अमितकुमार मिश्रा, बॅंक ऑफ महाराष्ट्र्चे विभागीय व्यवस्थापक विवेक नाचणे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक सुरेश पटवेकर, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक प्रेषित मोघे तसेच सर्व बॅंकांचे, महामंडळे व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्याचा सन २०२५-२६ चा वार्षिक पतआराखडा यावेळी सादर करण्यात आला. हा पतआराखडा एकूण ३३ हजार ५०० कोटी रुपयांचा असून त्यात प्राधान्यक्षेत्रासाठी १६ हजार ७०० कोटी रुपयांचा आराखडा आहे. त्यात पिक कर्ज २४०० कोटी रुपये, मुदत कर्जे ३२०० कोटी रुपये असे एकूण कृषीक्षेत्रासाठी ५६०० कोटी रुपये, इतर प्राधान्य क्षेत्रासाठी १४०० कोटी रुपये , सुक्ष्म व लघु उद्योग क्षेत्रासाठी ९७०० कोटी रुपये असे एकूण प्राध्यान्य क्षेत्रासाठी १६ हजार ७०० कोटी रुपये, तर इतर (प्राधान्य नसलेल्या क्षेत्रासाठी) १६ हजार ८०० कोटी रुपये असे एकूण ३३ हजार ५०० कोटी रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला.
तसेच सन २०२४-२५ मध्ये गाठलेल्या आर्थिक उद्दिष्टांचाही आढावा यावेळी घेण्यात आला. माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात सार्वजनिक व सहकारी बॅंका असे मिळूण एकूण ५१२ शाखांचे जाळे आहे. प्राधान्य क्षेत्रासाठी ठरविण्यात आलेल्या १३ हजार ९०० कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठ्याच्या तुलनेत १५ हजार ८०६ कोटी रुपयांचे वितरण झाले. हे एकूण ११४ टक्के आहे. त्यात कृषी क्षेत्रासाठी ४हजार ७५० कोटी रुपयांच्या तुलनेत ५ हजार २८९ कोटी रुपयांचे वितरण झाले. गत वर्षी पिक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट २४०० कोटी रुपये इतके होते प्रत्यक्षात ते २ हजार १३० कोटी रुपये म्हणजेच ९० टक्के झाले, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, जिल्ह्यात विविध क्षेत्रात बॅंकानी अर्थसहाय्य करणे आवश्यक आहे. महिलांच्या स्वयंरोजगारासाठी स्वयंसहायता गटांना केला जाणारा पतपुरवठा चांगला असून त्याद्वारे महिलांना रोजगार व्यवसायाची संधी उपलब्ध होत आहे. ज्या क्षेत्रात रोजगाराच्या संधींना वाव आहे तेथे अर्थ पुरवठा वाढवला पाहिजे. पिक कर्ज वाटप हे योग्य त्या वेळेत होणे आवश्यक आहे. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांना वेळेत अर्थ पुरवठा व्हावा. जेणे करुन त्यांना पैसा वेळेत कामात यावा.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत आणि प्रकल्प व्यवस्थापक अशोक शिरसे यांनीही आपले मनोगत यावेळी मांडले.
