प्रभाग रचना प्रक्रिया 30 जून अखेर पूर्ण करावी
– जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने 2017 च्या प्रभाग रचनेनुसार निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे पार पाडली जाणार आहे. ही प्रक्रिया दिलेल्या वेळापत्रकानुसार दि.30 जून पर्यंत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती कक्षात जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रभाग रचने संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन संगीता राठोड उपजिल्हाधिकारी डॉ.सुचिता शिंदे, सर्व तहसीलदार, व गटविकास अधिकारी ,नायब तहसीलदार व प्रभाग रचना संदर्भातील संबंधित कर्मचारी या बैठकीस उपस्थित होते.
या संदर्भात निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार नागरिकांना विश्वासात घेऊन प्रभाग रचना प्रक्रिया पूर्ण करावी. आयोगाने दिलेल्या वेळापत्रकानुसार या प्रभाग रचना प्रसिद्ध करणे, त्यावर 14 जुलै पर्यंत सूचना व हरकती प्रसिद्ध करून त्या मागविणे, त्या आधी दि. ३०जून पर्यंत प्रभाग रचना तयार करावी.
प्रभाग रचने संदर्भात येणाऱ्या सूचना हरकती याविषयी लेखी नोंद,सूचना,हरकतीच्या लेखी नोंद पंचायत समिती तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालयाचे संकेतस्थळ, आणि विविध वर्तमानपत्रांमध्ये प्रभाग रचने संदर्भाची माहिती प्रसिद्ध करावी, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यामध्ये 63 गट आणि गण 126 गण असून यानुसार प्रभाग रचना प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. 2017 च्या लोकसंख्येच्या नुसार प्रभाग रचना ही कायम राहून यानुसारच निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
