Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादस्मार्ट मीटर बसवलेल्या सव्वादोन लाख वीजग्राहकांना 2 कोटींची सवलत! दिवसा वीजवापराचा...

स्मार्ट मीटर बसवलेल्या सव्वादोन लाख वीजग्राहकांना 2 कोटींची सवलत! दिवसा वीजवापराचा फायदा

स्मार्ट मीटर बसवलेल्या सव्वादोन लाख वीजग्राहकांना 2 कोटींची सवलत!

दिवसा वीजवापराचा फायदा

छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट मीटर बसवलेल्या परिमंडलातील 2 लाख 20 हजार 665 घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापरावर (टाइम ऑफ डे) गेल्या सात महिन्यांत जवळपास 2 कोटी रुपयांची सवलत वीजबिलात मिळाली आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर बसवण्याकामी ग्राहकांनी महावितरण आणि संबंधित एजन्सीला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी निश्चित केलेल्या वीजदरामध्ये घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रतियुनिट 80 पैसे ते 1 रुपया सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीजदरात सवलत मिळण्याचा प्रत्यक्ष फायदा 1 जुलैपासून सुरू झाला आहे. महावितरणकडून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत.

छत्रपती संभाजीनगर परिमंडलात 2 लाख 20 हजार 665 घरगुती ग्राहकांना जुलै-2025 ते जानेवारी-2026 या सात महिन्यांच्या वीजबिलात 1 कोटी 98  लाख 92 हजार 734 रुपयांची टीओडी सवलत मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहर मंडलातील 57  हजार 190 ग्राहकांना 79 लाख 34 हजार 138 रुपये, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलातील 1 लाख 11 हजार 498 ग्राहकांना 79 लाख 87 हजार 831 रुपये तर जालना मंडलातील 52 हजार 17 ग्राहकांना 39 लाख 70 हजार 765 रुपये सवलत मिळाली आहे.

नव्या तंत्रज्ञानाच्या मीटरचे रीडिंग ऑटोमॅटिक होत  असल्याने अचूक बिले मिळून घरातील विजेचा वापर दर तासाला संबंधित ग्राहकांना मोबाईलवर पाहता येत आहे. त्याद्वारे ग्राहकांचे वीजवापरावरही थेट नियंत्रण राहत आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वीजग्राहक घरातील प्रामुख्याने वॉशिंग मशीन, ओव्हन, गिझर, एअर कंडिशनर व इतर उपकरणांचा मोठा वापर करतात. त्यात टीओडी मीटरमुळे ग्राहकांचा मोठा आर्थिक फायदा होत आहे.

         टाईम ऑफ डे प्रणालीनुसार वीज वापराच्या कालावधीनुसार दर आकारणी केली जाते. औद्योगिकनंतर घरगुती ग्राहकांना प्रथमच स्वस्त वीज दरासाठी टीओडीप्रमाणे आकारणी सुरू झाली आहे. महावितरणकडून सन 2025 ते 2030 या पाच वर्षांसाठी घरगुती ग्राहकांसाठी टाईम ऑफ डे (टीओडी) नुसार स्वस्त वीजदराचा प्रस्ताव आयोगाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार आयोगाने घरगुती ग्राहकांसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वापरलेल्या विजेसाठी प्रतियुनिट 80 पैसे ते 1 रुपया सवलत मंजूर केली आहे. यात 1 जुलै 2025 ते मार्च 2026 मध्ये 80 पैसे, 2026-27 मध्ये 85 पैसे, 2027-28 व 2028-29 मध्ये 90 पैसे तसेच 2029-30 मध्ये 1 रुपये प्रतियुनिट सवलत मिळणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी टीओडी मीटर घरगुती ग्राहकांकडे बसविणे आवश्यक आहे.

     ग्राहकांना अचूक व वेळेत वीजबिल देण्यास उपयुक्त ठरणारे अत्याधुनिक टीओडी वीजमीटर  प्री-पेड नसून, पोस्टपेड आहेत. पूर्वीप्रमाणेच वीजवापरानंतरच ग्राहकांना वीजबिले मिळणार आहेत. हे मीटर मोफत बसवण्यात येत असून, ग्राहकांना कुठलाही आर्थिक भुर्दंड बसणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. यात मानवी हस्तक्षेपाला अजिबात वाव नाही. टीओडी मीटर असल्याशिवाय घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापराची सवलत मिळू शकणार नाही. त्यामुळे ग्राहकांच्या दृष्टीने टीओडी मीटर आवश्यकच आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी टीओडी मीटर बसविण्याकामी महावितरण आणि संबंधित एजन्सीला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments