१८ तास अभ्यास करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
सुंदरराव सोळंके महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम
माजलगाव /प्रतिनिधी/ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सुंदरराव सोळंके महाविद्यालयात १८ तास अभ्यास अभियान राबवून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
सुंदरराव सोळंके महाविद्यालय व क्रांतीसुर्य म. ज्योतिबा फुले सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुंदरराव सोळंके महाविद्यालयातील राजर्षी शाहू महाराज ग्रंथालयात १८ तास अभ्यास अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जेष्ठ पत्रकार उमेशजी मोगरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एम. ए. कव्हळे होते तर पत्रकार उमेश जेथलिया, प्रा. सुदर्शन स्वामी, अशोक मगर सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब ताकट,उपप्राचार्य डॉ. एन. के. मुळे, उपप्राचार्य प्रा पवन शिंदे ,पर्यवेक्षक महादेव अलझेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त देशभरात विविध उपक्रम साजरे केले जात आहेत.त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांसाठी आठरा तास अभियान उपक्रम घेण्यात आला. यावेळी उद्धाटनपर भाषण करताना उमेशकाका मोगरेकर म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य देशालाच नाही तर जगाला प्रेरणादायी व दिशादर्शक आहे.समताभिमुख समाज घडविण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान महत्वाचे आहे. यावेळी उमेश जेथलिया म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष सर्वमान्य झाला आहे. आठरा तास अभ्यासामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवड निर्माण होईल.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ. एम.ए.कव्हळे म्हणाले की वाचनाने सत्य आणि असत्य यातील फरक समजतो. त्यामुळे मस्तक जाग्यावर राहून माणूस कोणाचा हस्तक होत नाही. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तावित प्रा.संजय बागुल यांनी केले. सूत्रसंचालन बी. एस. बनसोडे यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रकाश गवते यांनी मानले.यावेळी विद्यार्थी – विद्यार्थीनी, प्राध्यापक, ग्रंथालय कर्मचारी यांची उपस्थिती होती.