Tuesday, October 28, 2025

 ३० एप्रिल महात्मा बसवेश्वर जयंती.

प्रति माननीय संपादकजी
विषय:-.मानव कल्याणासाठी बसवेश्वर महाराजांच्या कार्याचे अनुकरण आवश्यक. 
बसवेश्वर महाराजांना कोणत्याही प्रकारचा लोभ नसल्यामुळे न्याय प्रीय राजा होते.बसवेश्वर महाराज हे बसव,बसवण्णा इत्यादी नावाने ओळखले जात असले तरीही थोर समाजसुधारक म्हणून त्यांची मोठी ख्याती होती.त्यामुळे त्यांचे कार्य आजही तेवढेच महत्त्वाचे व गरजेचे आहे.इ.स.११०५ ते ११६५या कालखंडात होऊन गेलेले कर्नाटकातील संत व समाजसुधारक होते.त्यांनी नेहमी निर्गुण व निराकार एकेश्वरवाद श्रध्देचा पुरस्कार केला. कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी या गावात ११०५ साली वीरशैव कुटुंबात बसवेश्वर महाराजांचा जन्म झाला. मुख्यत्वेकरून त्यांचा जन्म अक्षतृतीयेला झाला.अक्षतृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक व महत्वाचा दिवस मानल्या जातो. त्यामुळे या दिवसाला शुभ मानण्यात येते. बसवेश्वर महाराज कर्मठ विधीचा विरोध करायचे अशा परिस्थितीत मुंजीचा विरोध करून मला आधीच लिंगदीक्षा मिळाली आहे असे सांगत वयाच्या ८ व्या वर्षी घर सोडून ते कूडलसंगम येथे निघून गेले.कृष्णा व मलप्रभा या नद्यांच्या संगमावरील कुडलसंगम येथे मोठे अध्ययन केंद्र होते.तेथे बसवेश्वरांनी १२ वर्षे वास्तव्य केले.कुडलसंगम येथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा,धर्म, तत्वज्ञान इत्यादींचा प्रगल्भ अभ्यास केला.त्यांचा विवाह मामाच्या मुलीशी झाला व त्यानंतर सोलापूरातील मंगळवेढा येथे आले. बसवेश्वरांनी मंगळवेढा येथे लोकशाही संसद स्थापन केली.या संसद मंडपात सर्व धर्मातील लोक एकत्र येऊन सामाजिक अडचणींवर कशी मात करायची यावर चर्चा करून व योग्य निर्णय घेवून पुढील कार्य होत असे. बसवेश्वर यांचे एकच उद्दिष्ट होते ते म्हणजे समाजातील वाईट चालीरितीचा विरोध करून समाजाच्या हिताच्या गोष्टींची अंमलबजावणी करण्याकडे जास्त महत्त्व देत असे.१२ व्या शतकातील आदर्श,समतेचे, जनकल्याणाकारी प्रणेते म्हणून बसवेश्वर महाराज ओळखले जायचे.त्यामुळेच १२ व्या शतकापासून खऱ्या अर्थाने लोकशाहीला सुरूवात झाल्याचे सांगण्यात येते.कारण लोकशाहीमध्ये समता,मुल्य, न्याय, बंधूंता,एकात्मता, संपूर्ण स्वतंत्र, अधिकार,नियम, नियंत्रण, शिस्त,सूशासन व योग्य प्रशासन यामुळे समाज व देश घडण्यास मोठी मदत मिळते. बसवेश्वर महाराजांच्या संसदेत जातीभेला बीलकुलच थारा नव्हता.त्यामुळे त्यांना समाजाला एकत्र बांधण्यास मोठी मदत मिळाली.कारण कोणत्याही प्रकारचा भेदभाव ते कदापि सहन करत नसे.आपल्याला २१ व्या शतकात जे कायदे दिसतात त्यात बसवेश्वर महाराजांचा सिंहांचा वाटा आहे.बसवेश्वर महाराजांना साक्षात नंदीचा अवतार मानल्या जाते.आपण ज्याला शंकरजीच वाहन म्हणतो.भगवान शंभर या पृथ्वीचा,मानव, पशुपक्षी व जीवजंतू यांचा पालनहार आहे. त्यांच्या सोबत नंदी म्हणजे साक्षात परमेश्वर बसवेश्वर महाराज म्हणजे ही दैवी लीलाच म्हणावी लागेल.कृष्णा आणि मलापहारी नद्यांच्या संगमावर असलेल्या गुरूकुलात ज्ञानी गुरूजनांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिक्षण घेतले.विविध ग्रंथांचा, ज्ञानाच्या सर्व शाखांचा अभ्यास केला. त्यामुळेच त्यांनी संस्कृत ग्रंथातील धर्मतत्वे कन्नडमधुन लिहिली.बसवेश्वर महाराजांनी नेहमी आध्यात्मिक जीवन व समाज घडवीण्याच्या चालीरीतीचे मार्गदर्शन नेहमीच करीत असे.कर्नाटक व दक्षिण महाराष्ट्रात आपल्याला लोकांच्या जिभेवर आजही बसवेश्वरांची वचने आरूढ झाल्याचे दिसून येते.सत्ता वैभव आणि कीर्ती याला यत्किंचितही वाव न देता आध्यात्मिक व नितिमुल्याला प्रथम प्राधान्य देवून समाज हितासाठी अहोरात्र प्रयत्न केले. बसवेश्वरांच्या काळात समाजव्यवस्थेत स्त्रीयांना शुद्र, बहिष्कृत समजले जायचे. त्यांना स्त्रीयांवर होत असलेला अत्याचार सहन झाला नाही. याकरीता त्यांनी या विरूद्ध मोठा लढा उभारून मोठे भरीव कार्य केल्याचे दिसून येते.तत्कालीन समाजव्यवस्थेला व राजसत्तेला हादरवून टाकणारा आंतरजातीय विवाह महात्मा बसवेश्वरांच्या पुढाकाराने १२ व्या शतकात घडला.त्यामुळे बसवेश्वर महाराजांचे प्रत्येक कार्य व त्यांची जीवनशैली आज समाजाला प्रेरणादायी ठरू शकते व ठरत आहे.आज देशातील राजकीय पुढाऱ्यांनी बसवेश्वर महाराजांचे आदर्श सामोरं ठेऊन समाज हितांचे व देश हिताचे कार्य करण्याची नितांत गरज आहे.राजकीय पुढाऱ्यांनी बसवेश्वर महाराजांचे अनुकरण करून भ्रष्टाचार व वाजवीपेक्षा जास्त असलेली चल-अचल संपत्तीचा त्याग करून सरकारी तिजोरीत जमा करावी किंवा जनकल्याणासाठी उपयोगात आणली पाहिजे व महात्मा बसवेश्वरांचे आदर्श सामोरं ठेऊन समाजकार्य केले तरच  खऱ्या अर्थाने राजकीय पुढाऱ्यांमार्फत बसवेश्वर महाराजांची जयंती साजरी झाली असे गृहीत धरले जाईल.कारण राजकीय पुढाऱ्यांजवळ समाजसेवक, लोकप्रतिनिधी,जनप्रतिनिधी अशी मोठी जबाबदारीची आणि नामांकित पदे आहेत.त्याचा उपयोग समाज घडविण्यासाठी व्हायलाच हवा.बसवेश्वर महाराजांजवळ कोणतेही पद नसताना समाज हितासाठी अहोरात्र कार्य केले.कारण ते त्यागी, निष्ठावान,महान समाजसेवक व समाजसुधारक होते.त्यांचे अनुकरण करून आजच्या राजकीय पुढाऱ्यांनी कार्य करण्याची नितांत गरज आहे.वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय्य तृतीया यांच दिवशी महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला.त्याचप्रमाणे याच दिवशी पराक्रमी भगवान परशुराम यांचाही जन्म झाला हा एक संयोगच म्हणावा लागेल.अक्षय्य तृतीया या शुभ मुहूर्ताचे औचित्य साधून,महात्मा बसवेश्वर आणि भगवान परशुराम यांच्या जयंतीचे शुभ संकेत लक्षात घेता या भारत भुमित आजच्या दिवशी प्रत्येकांनी एकतरी वृक्ष लावुन आगळावेगळा ऐतिहासिक उपक्रम राबवुन पृथ्वीला वाचविण्याचा संकल्प संपूर्ण मानवजातीने करायला हवा.कारण मानवजातीच्या कल्याणासाठी आज तीन दैवी शक्ती एकत्र विराजमान आहेत.त्यामुळे तीन दैवी शक्तीचा (अक्षय्य तृतीया, बसवेश्वर जयंती,परशुराम जयंती)  संयोग दिवस ३० एप्रिलला उजाडला आहे.यामुळे प्रत्येकांनी वृक्षारोपण करून मानवजातीचा धर्म पाळला पाहिजे.यामुळे ऑक्सिजनची मात्रा वाढेल व मानवजातीचे कल्याण होईल, गुरांना मोठ्या प्रमाणात चारा मिळेल, पशुपक्ष्यांना शुद्ध हवा व सावली मिळेल.यातच आपल्याला अक्षय्य तृतीया,महात्मा बसवेश्वर,भगवान परशुराम यांचे दर्शन घडुन येईल यात दुमत नाही. कारण संपूर्ण वृक्षांच्या जळा-मूळात, फळात, फुलात, पानात व झाडांच्या कणाकणात आपल्याला थोरमहात्म्यांचा, साधुसंतांचा व बसवेश्वर महाराजासह संपूर्ण देवी-देवतांचा वास अवश्य दिसून येईल.
–  रमेश कृष्णराव लांजेवार

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments