सुधारित अनुदान योजनेसाठी १४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई – अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अल्पसंख्याक बहुल शासन मान्यताप्राप्त खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी सुधारित अनुदान योजना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या अटी व शर्तींची पूर्तता करून विहित नमुन्यातील अर्जासह संपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी, मुंबई शहर (जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई – ४००००१) येथे १४ नोव्हेंबर, २०२५ पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.
अर्जाचा नमुना https://mdd.maharashtra.gov.in यावर उपलब्ध आहे. निर्धारित दिनांकानंतर प्राप्त होणारे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत. प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक १४ नोव्हेंबर असून, जिल्हाधिकारी कार्यालयाने प्राप्त प्रस्तावांची छाननी करून, त्रुटींची पूर्तता करून, अंतिम पात्र प्रस्ताव शासनास सादर करण्याचा अंतिम दिनांक – १५ डिसेंबर, २०२५ पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे अथवा दूरध्वनी: ०२२-२२६६०१६७, ई-मेल: dpomumbaicity@gmail.com यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
