Wednesday, October 29, 2025
Homeऔरंगाबादवीजसेवेची माहिती 'एसएमएस'वर; 13 लाख ग्राहकांची नोंदणी मराठी व इंग्रजीत सेवा,...

वीजसेवेची माहिती ‘एसएमएस’वर; 13 लाख ग्राहकांची नोंदणी मराठी व इंग्रजीत सेवा, भाषा निवडीचे अधिकार ग्राहकांना

वीजसेवेची माहिती ‘एसएमएस’वर; 13 लाख ग्राहकांची नोंदणी

मराठी व इंग्रजीत सेवा, भाषा निवडीचे अधिकार ग्राहकांना

छत्रपती संभाजीनगर : वीजबिलाचा तपशील तसेच वीजपुरवठा बंद असण्याचा कालावधी व इतर माहिती ‘एसएमएस’द्वारे मिळवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील तेरा लाखांहून अधिक ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदवला आहे. हे ‘एसएमएस’ मराठी किंवा इंग्रजीत दिले जात असून, भाषा निवडीचे अधिकार ग्राहकांना आहेत.

छत्रपती संभाजीनगर परिमंडलात सर्व वर्गवारीतील एकूण 13 लाख 71 हजार 359 वीजग्राहक आहेत. त्यापैकी 95.52 टक्के अर्थात 13 लाख 9 हजार 914 ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदवलेला आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलातील 6 लाख 46 हजार 90 ग्राहकांपैकी 6 लाख 22 हजार 148, छत्रपती संभाजीनगर शहर मंडलातील 3 लाख 61 हजार 983 ग्राहकांपैकी 3 लाख 43 हजार 208 व जालना मंडलातील 3 लाख 63 हजार 286 ग्राहकांपैकी 3 लाख 44 हजार 558 ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंद केलेली आहे.

नोंदणीकृत ग्राहकांना वीजबिलाची माहिती, तांत्रिक बिघाड किंवा नियोजित देखभाल व दुरुस्तीमुळे वाहिनीवरील बंद असलेला वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा कालावधी, मीटर रीडिंग, बिल भरण्याची अंतिम तारीख ही माहिती त्यांच्या मोबाईल क्रमांकांवर ‘एसएमएस’द्वारे  पाठवण्यात येत आहे.

निवडलेली भाषा बदलण्याचा पर्याय

महावितरणकडून ग्राहकांना मोबाईलवर पाठवले जाणारे संदेश मराठी किंवा इंग्रजी या भाषेत दिले जातात. त्यासाठी भाषा निवडीचे अधिकार ग्राहकांना आहेत. मोबाईल सेवेसाठी अर्ज करताना जी भाषा ग्राहकाने निवडली आहे, त्या भाषेत त्यांना संदेश जात असल्याचे महावितरणने कळवले आहे.

ग्राहकांना मराठी किंवा इंग्रजी या भाषेतून ‘एसएमएस’ मिळवण्याचा पर्याय आहे. त्यासाठी ग्राहकांना नोंदणी करताना भाषा निवडता येते. ग्राहकाने यापूर्वी इंग्रजी वा मराठी भाषा निवडली असेल तरी ती भाषा बदलण्याचे स्वातंत्र्य ग्राहकास आहे. ग्राहक https://pro.mahadiscom.in/ConsumerInfo/consumer.jsp या थेट लिंकवर जाऊन भाषेचा पर्याय निवडू शकतात किंवा भाषा निवडीसाठी MLANG <12 अंकी ग्राहक क्रमांक> <M> हा एसएमएस 9930399303 क्रमांकावर पाठवू शकतात. याशिवाय 24 तास सुरू असणाऱ्या कॉल सेंटरच्या टोल फ्री 1912 किंवा 1800-212-3435 किंवा 1800-233-3435 या क्रमांकावर संपर्क साधून मोबाईल नोंदणी करून भाषा बदलता येते.

छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, कृषी व इतर अशा सर्व वर्गवारीतील ज्या ग्राहकांना आपला मोबाईल क्रमांक बदलायचा आहे, अशा ग्राहकांनी तसेच ज्यांना नव्याने क्रमांक नोंदवायचा अशा ग्राहकांनी वरील पर्यायांद्वारे नोंदणी करावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments